श्रीनगर : जम्मू-कश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील कटरा येथे सोमवारी (दि.१) मुसळधार पावसामुळे माता वैष्णो देवी मंदिराची यात्रा सलग सातव्या दिवशी स्थगित ठेवण्यात आली आहे. गेल्या मंगळवारी यात्रेच्या मार्गावर भूस्खलन झाल्याने ३४ भाविकांचा मृत्यू झाला होता. श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डने जाहीर केलं आहे की, यात्रा पुन्हा सुरू होईपर्यंत हेलिकॉप्टर, निवास आणि इतर सर्व बुकिंग रद्द करण्यात आले असून शंभर टक्के पैसे परत दिले जातील.
एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “गेल्या आठवड्यापासून यात्रा स्थगित आहे. हवामान अजूनही खराबच आहे, त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी यात्रा थांबवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.” कटरा आणि त्रिकुटा पर्वतरांगांमध्ये सोमवारी पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की,कटरा ते भवन दरम्यानची हेलिकॉप्टर सेवा, भवन ते भैरव घाटीपर्यंतची रोपवे राइड,हॉटेल बुकिंग आणि अन्य प्रवासाशी संबंधित व्यवस्था सर्वच रद्द करण्यात आले आहेत.
श्राइन बोर्डने एक्सवर एका पोस्टमध्ये सांगितलं की, “यात्रा पुन्हा सुरू होईपर्यंत सर्व बुकिंग रद्दच राहतील आणि पूर्ण रक्कम परत केली जाईल. स्वतःहून बुकिंग रद्द करणाऱ्यांना १५ दिवसांच्या आत पैसे परत मिळतील.” श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डकडून सर्व यात्रेकरूंना सल्ला दिला गेला आहे की, यात्रा कधी सुरू होईल यासाठी बोर्डचे अधिकृत सोशल मीडिया पेजेस नियमितपणे फॉलो करा,श्राइन बोर्डच्या वेबसाइटवरही अद्ययावत माहिती मिळेल,स्थानिक हवामान लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करा आणि भारतीय हवामान खात्याच्या हवामान इशाऱ्यांना जरूर फॉलो करा.
रियासी जिल्हा हा सध्या जोरदार पावसाने सर्वाधिक प्रभावित आहे. गेल्या मंगळवारी कटरा परिसरातील त्रिकुटा पर्वतरांगेतील अर्धकुंवारी मंदिर मार्गावर ढगफुटीमुळे भूस्खलन झाले, ज्यात ३४ श्रद्धाळूंचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले होते. त्या दुर्घटनेनंतर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी उच्चस्तरीय तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीचे नेतृत्व जलशक्ती विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव शालीन काबरा करतील आणि त्यामध्ये जम्मूचे विभागीय आयुक्त व पोलीस महानिरीक्षक यांचा समावेश आहे.