नवी दिल्ली: ज्येष्ठ आणि अत्यंत अनुभवी सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. या सोबतच माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, प्रसिद्ध इतिहासकार डॉ. मीनाक्षी जैन आणि केरळमधील प्रसिद्ध समाजसेवक आणि शिक्षणतज्ज्ञ सदानंदन मास्टर यांनाही राज्यसभेसाठी नामांकित करण्यात आले आहे. संविधानाच्या कलम ८० अंतर्गत भारताच्या राष्ट्रपतींनी हे नामांकन केले आहे.
उज्वल निकम यांनी अलीकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. यानंतर आता त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत संधी देण्यात आली आहे. महत्त्वाच्या आणि उच्चस्तरीय गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष छाप आहे. त्यांच्या राज्यसभेवरील या नियुक्तीने कायद्याच्या क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आता संसदेच्या सभागृहात प्रतिनिधित्व करणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
न्याय क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व : उज्ज्वल निकम यांचं नाव १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामुळे राष्ट्रीय पातळीवर गाजले. या खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्यांनी काही महत्त्वाच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून जबाबदारी पार पाडली. निकम यांनी आपल्या करिअरमध्ये १९९३ चे मुंबई बॉम्बस्फोट खटले, गुलशन कुमार हत्या प्रकरण, प्रमोद महाजन हत्या, २६/११ मुंबई हल्ला, कोपर्डी बलात्कार प्रकरण आदी हाय-प्रोफाईल गुन्ह्यांमध्ये सरकारी वकील म्हणून प्रभावी युक्तिवाद करून गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. सध्या निकम हे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील आहेत.