bank of maharashtra

सुवर्ण मंदिर बॉम्ब धमकी प्रकरणी तामिळनाडूमधून दोघांना अटक

0

अमृतसर : सुवर्ण मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीला (एसजीपीसी) पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ईमेल प्रकरणी तामिळनाडूमधून दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून तपास पथके तामिळनाडूमध्ये सक्रिय होती. १४ जुलैपासून एसजीपीसीला मिळालेल्या पाच ईमेल्समध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला आरडीएक्सचा वापर करून उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली असून, व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे.

अटक करण्यात आलेल्या दोघांची ओळख अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नसली तरी, पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या चौकशीतून काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणा हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की हे एकटे प्रकरण आहे की यामागे एखादे संघटित कट्टरपंथी नेटवर्क कार्यरत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव आणि इतर वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत आपत्कालीन बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले, “सुवर्ण मंदिराच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. हा आमच्यासाठी केवळ धार्मिक नाही, तर राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे. सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून, देशविरोधी शक्तींना माफ केले जाणार नाही.”

तसेच त्यांनी नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. एसजीपीसीने व्यक्त केली होती चिंता एसजीपीसीचे अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी यांनी या संपूर्ण घटनेवर चिंता व्यक्त करत म्हटले होते की, “ही धमकी एकट्या व्यक्तीचा प्रयत्न आहे की यामागे काही मोठा कट आहे, हे स्पष्ट नाही. परंतु, अशा धमक्या धार्मिक वातावरण बिघडवू शकतात. आम्ही सरकारकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी करतो.” सध्या या प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू असून, तपास यंत्रणा तांत्रिक पुरावे आणि आरोपींच्या पार्श्वभूमीची बारकाईने चौकशी करत आहेत. पंजाबसह संपूर्ण देशातील धार्मिक स्थळांच्या सुरक्षेबाबत यामुळे नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech