वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अतिशय चांगले वैयक्तिक संबंध होते, पण “आता ते संपले आहेत”, असे विधान अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) जॉन बोल्टन यांनी केलं आहे. पुढे त्यांनी इशारा दिला की एखाद्या अमेरिकन नेत्यासोबत असलेले घनिष्ठ संबंध, जागतिक नेत्यांना “सर्वात वाईट” काळापासून वाचवू शकत नाहीत. बोल्टन यांची ही टिप्पणी भारत-अमेरिका संबंधांच्या मागील दोन दशकांतील कदाचित सर्वात खराब टप्प्याच्या पार्श्वभूमीवर आली आहे, ज्यामध्ये ट्रम्प यांची टॅरिफ (शुल्क) नीती आणि त्यांच्या प्रशासनाकडून भारतावर सातत्याने होणारी टीका यामुळे तणाव अधिक वाढला आहे.
जॉन बोल्टन यांनी अलीकडेच ब्रिटिश मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले, “माझ्या मते, ट्रम्प आंतरराष्ट्रीय संबंधांना नेत्यांशी असलेल्या त्यांच्या वैयक्तिक नात्यांच्या दृष्टिकोनातून पाहतात. त्यामुळे जर त्यांचे (रशियाचे अध्यक्ष) व्लादिमीर पुतिन यांच्याशी चांगले संबंध असतील, तर अमेरिकेचेही रशियासोबत चांगले संबंध असतील, असं त्यांना वाटतं. पण वास्तवात, तसं नसतं.” बोल्टन हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. मात्र आता ते ट्रम्प यांचे खुलेआम टीकाकार आहेत.
बोल्टन यांनी पुढे सांगितले, “ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये वैयक्तिक पातळीवर खूप चांगले संबंध होते. पण आता मला वाटतं की ते नाते संपलं आहे, आणि ही गोष्ट सगळ्यांसाठी एक धडा आहे. उदाहरणार्थ, (ब्रिटनचे पंतप्रधान) कीर स्टार्मर यांच्यासाठी की वैयक्तिक नातं कधी कधी उपयुक्त ठरू शकतं, पण ते तुम्हाला सर्वात वाईट परिस्थितीपासून वाचवू शकत नाही.” या मुलाखतीनंतर सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये बोल्टन यांनी म्हटले की, व्हाइट हाउसने “अमेरिका-भारत संबंधांना दशकांपूर्वीच्या स्तरावर ढकलले आहे, ज्यामुळे मोदी रशिया आणि चीनच्या अधिक जवळ गेले आहेत. चीनने स्वतःला अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या पर्यायाच्या रूपात सादर केले आहे.”