मुंबई : राज्यात पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्यावरून अलीकडच्या काळात बराच विरोध पाहायला मिळाला.त्यामुळे सरकारने तात्काळ त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही जीआर रद्द करण्याची घोषणा करत यावर समिती स्थापन केली. मात्र, आता आम्ही महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच असं विधान करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा त्रिभाषा सूत्रावर आपली ठाम भूमिका मांडली आहे. मुंबईत एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात पहिली पासून त्रिभाषा सूत्र लागू करण्यावरून वेगवेगळी मते आल्यानंतर आम्ही पुन्हा विचार केला, हा अहवाल आपल्या काळात आला नव्हता. त्यामुळे पुन्हा सर्वांची मते ऐकून घेतली पाहिजेत. त्यासाठी आम्ही समिती तयार केली आहे. आमच्यासाठी हा प्रतिष्ठेचा विषय नाही पण एक गोष्ट निश्चित सांगतो, त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात लागू होईलच. ते पहिलीपासून होईल की पाचवीपासून हे समिती ठरवेल मात्र १०० टक्के त्रिभाषा सूत्र आम्ही महाराष्ट्रात लागू करू आणि माझा सगळ्यात जास्त विरोध हा इंग्रजीला पायघड्या घालायचे आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही. भारतीय भाषांचा विरोध हा मी सहन करणार नाही.
पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरे किती पलटी मारू शकतात याचे उदाहरण म्हणजे त्रिभाषा सूत्राबाबत निघालेला जीआर आहे. मविआ सरकारने याबाबत समिती बनवली होती. त्यात भाषेबाबत उपसमिती होती, त्यात त्यांच्या पक्षाचा उपनेता होता. पहिलीपासून बारावीपर्यंत हिंदी आणि इंग्रजी बंधनकारक करा अशी शिफारस या समितीने दिली. हा अहवाल उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात स्वीकारला. पुढच्या आठवड्यात पुष्टीकरणासाठी आला त्यावर मुख्यमंत्र्यांनी सही केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भूमिका बदलली. मी वाचलेच नाही असं ते म्हणाले. माध्यमांचे आश्चर्य वाटते. त्यांनी सांगितले आणि तुम्ही ऐकून घेतले. मी मुख्यमंत्री म्हणून म्हटलं असते मी वाचले नाही आणि कॅबिनेटमध्ये मंजूर केले तेव्हा मला फाडून खाल्ले असते. ४ दिवस जगू दिले नसते असं त्यांनी म्हटलं.