मुंबई : यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडीऐवजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताच अधिक आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येणाऱ्या ६ ते ७ दिवसांमध्ये महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. देशातील बहुतांश भागात २० ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी होणार असल्याने यावर्षी दिवाळीत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार १९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान, मुंबईतील अनेक भागात ढगाळ वातावरण राहू शकतं. तसेच अधूनमधून सौम्य पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. या दरम्यान, मुंबईतील बहुतांश भागात तापमान २३ डिग्री सेल्सियस ते ३६ डिग्री सेल्सियस या दरम्यान, राहण्याची शक्यता आहे. याबरोबरच केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.तर स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने येणाऱ्या दिवसांत दक्षिण तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. मात्र या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. मात्र समुद्रात अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची आणि हवेचा वेग वाढण्याची शक्यता आहे.