सरकारकडून ठोस निर्णय होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार – जरांगे
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. ३१ ऑगस्ट रोजीही त्यांचा संघर्ष कायम राहणार आहे. पण त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये चिंता वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी अन्न-पाणी ग्रहण केलेले नसल्याने शनिवारी मध्यरात्री त्यांना अस्वस्थता जाणवली. त्यांची तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली असून बीपी-शुगर नॉर्मल असल्याचा दावा केला आहे.आणखी काही काळ उपोषण सुरू राहिल्यास त्यांची प्रकृती गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
मनोज जरांगे यांनी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, या मागणीवर ठाम भूमिका घेतली असून सरकारशी झालेल्या चर्चेत अद्याप कोणताही ठोस निर्णय निघालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळाशी जरांगे यांची बैठक झाली, मात्र त्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहात आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. जरांगे यांचे म्हणणे आहे की सरकार गंभीरतेने हा प्रश्न सोडवत नाही आणि प्रतिनिधींना त्यासाठी आवश्यक अधिकारही देण्यात आलेले नाहीत.
दरम्यान, आझाद मैदान आणि दक्षिण मुंबई परिसर मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले आहे. सीएसएमटी, बीएमसी तसेच मंत्रालय परिसरात आंदोलकांचा तुफान जमाव दिसून येतो. आंदोलक मंत्र्यांच्या बंगल्याकडे कूच करू नयेत म्हणून मंत्रालयापासून एअर इंडिया सिग्नलपर्यंत पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने दक्षिण मुंबईत कडक बंदोबस्त ठेवला आहे.
सरकारकडून वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप करत जरांगे यांनी स्पष्ट केले आहे की मराठ्यांना कुणबी (ओबीसी) दर्जा मिळवून देण्यासाठीचा लढा आता अंतिम टप्प्यात आहे. शिंदे समितीकडे खरे अधिकार नाहीत आणि फक्त दस्तऐवजांचा अभ्यास करून वेळ वाया घालवला जात आहे, असे ते म्हणाले. त्यांनी सरकारला इशारा दिला की समाजाची अंतिम लढाई आता सुरू झाली आहे आणि ठोस लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील.
राज्य सरकारवर विविध राजकीय नेत्यांनीही निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घटनादुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल, असे सांगत तमिळनाडूचे उदाहरण दिले. तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांना मूलभूत सुविधा न पुरवल्याबद्दल सरकारवर टीका केली आणि शिवसैनिकांना मदतीचे आवाहन केले. जरांगे यांनी बीएमसीवर अन्न-पाणी बंद करण्याचा आरोप केला असला तरी पालिकेने मैदानात खडी टाकण्यासह आवश्यक व्यवस्था केली असल्याचा दावा केला आहे.
काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेतली. यावेळी जरांगे यांच्याशी झालेल्या चर्चेचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला. आज सकाळी उपसमितीची आणखी एक महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीतून तोडगा निघेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आझाद मैदानात मराठा बांधवांची गर्दी वाढत असून राज्यभरातून आलेल्या बांधवांकडून उपोषणकर्त्यांसाठी अन्न आणि फळांचे वाटप करण्यात येत आहे. आज सकाळीही सफरचंद, केळी यांचा नाश्ता वाटण्यात आला. मात्र, मनोज जरांगे यांनी अन्न-पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती अधिकच ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.