चांदवड : धोडंबे सहकारी संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम असून, संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. आज चांदवड तालुक्यातील धोडंबे येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यालयाचे उद्घाटन व वैकुंठरथ लोकार्पण प्रसंगी मंत्री ॲड. कोकाटे बोलत होते. यावेळी खासदार भास्कर भगरे, आमदार डॉ. राहुल आहेर, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलानी, सरपंच मेघना रकीबे, संस्थेचे चेअरमन तथा सभापती नितीन उशीर,संचालक दिलीपकुमार केदार, उपसभापती केदू रकीबे , सचिव अरुण जाधव यांच्यासह संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, धोडंबे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा आर्थिक लेखाजोखा पाहता या संस्थेच्या रुपये ८५ लाख रकमेच्या ठेवी व रुपये २२ लाख रकमेचा इमारत निधी बँकेत जमा आहे. तसेच संस्थेमार्फत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जाची नियमित परतफेड होत असल्याने संस्थेची आर्थिक बाजू भक्कम असल्याचे मंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ऊर्जितावस्तेत आणण्यासाठी शासनस्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक नवीन कृषी योजना आखण्यात येत आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी राज्यात कृषी विभागाच्या जागेवर शॉपिंग मॉल्स उभारून शेतकरी ते ग्राहक अशी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.