अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव संवर्धनासाठी करण्यात आलेल्या योजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, सध्या या प्रकल्पात १५० वाघांचे वास्तव्य आहे. यामध्ये २५ नर, ४७ मादी आणि दोन वर्षांपर्यंत वय असलेले ७८ बछडे तसेच अन्य २७ तरुण वाघ समाविष्ट आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वांत जुना आणि महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प असून, येथील जैवविविधता ही पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही अत्यंत मोलाची मानली जाते. प्रकल्प क्षेत्रातील संरक्षण उपाय, टेहळणी यंत्रणा, ड्रोन निरीक्षण, वॉच टॉवर्स, व गावकऱ्यांचे सहभाग यामुळे वाघांच्या मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे.
सामान्यतः वन्य प्राण्यांमध्ये नैसर्गिक मृत्यू किंवा माणसांशी होणाऱ्या संघर्षामुळे मोठा धोका असतो. मात्र, २०२४-२५ वर्षात फक्त एका वाघाचा मृत्यू झाला आहे, ही गोष्ट प्रशासनाच्या आणि वन विभागाच्या कार्यक्षमतेचे प्रमाण मानली जात आहे. मेळघाटातील स्थानिक आदिवासी व गावकरी या संवर्धन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना रोजगार, शिक्षण व आरोग्याच्या सुविधा दिल्यामुळे वन्यजीवांशी संघर्ष कमी झाला असून, वाघ व माणूस यांचा सहअस्तित्वाचा आदर्श मेळघाटाने प्रस्तुत केला आहे.मेळघाटातील व्याघ्र प्रकल्प हे केवळ वाघांसाठीच नव्हे तर असंख्य इतर प्रजातींसाठी देखील सुरक्षित अधिवास बनला आहे. येथे बिबटे, अस्वले, सांबरे, चौशिंगा, गवा यांसारख्या अनेक प्रजाती आढळतात.
एकूण वाघांची संख्या : १५० नर वाघ : २५मादी वाघ : ४७ दोन वर्षांपर्यंतचे शावक : ७८ यासंदर्भात वन्यजीव अभ्यासक डॉ. जयंत वडतकर म्हणाले की, वाघांची वाढती संख्या अभिमानाची बाब आहे. प्रकल्पांचं यश हे पर्यावरण व विकास यात संतुलन राखल्याचं उदाहरण आहे. जर अशीच कामगिरी सुरू राहिली, तर महाराष्ट्र व्याघ्र संरक्षणात देशात आघाडीवर राहील असे त्यांनी सांगितले