नवी दिल्ली : शशी थरूर राष्ट्रीय सुरक्षेबाबतची भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत त्यांना तिरुअनंतपुरममधील कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमात आमंत्रित केले जाणार नाही, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. मुरलीधरन यांनी रविवारी केले आहे. तसेच ते म्हणाले, थरूर आता आपल्यात नाहीत. त्यामुळे त्यांनी कोणत्याही कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
याबाबत के. मुरलीधरन म्हणाले कि, काँग्रेस कार्यकारिणी समितीचे (सीडब्ल्यूसी) सदस्य असलेले थरूर आता आमच्यापैकी एक मानले जात नाहीत. काँग्रेस खासदारावर कोणती कारवाई करायची हे पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व ठरवेल.पुढे ते म्हणाले कि, जोपर्यंत थरूर त्यांची भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांना तिरुअनंतपुरममध्ये होणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमात आमंत्रित करणार नाही. ते आमच्यासोबत नाहीत, त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
मुरलीधरन यांनी यापूर्वीही थरूर यांना लक्ष्य केले आहे. अलिकडेच जेव्हा काँग्रेस खासदाराने सोशल मीडियावर एक सर्वेक्षण शेअर केले ज्यामध्ये त्यांना केरळमधील काँग्रेस आघाडीचा सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री चेहरा म्हणून वर्णन केले होते, तेव्हा मुरलीधरन म्हणाले होते की थरूर यांनी प्रथम ते कोणत्या पक्षाचे आहेत हे ठरवावे. दरम्यान, थरूर यांनी रविवारी, २० जुलै रोजी म्हटले होते की, कोणत्याही नेत्याची पहिली निष्ठा पक्षाप्रती नसून देशाप्रती असली पाहिजे. पक्ष हे देश सुधारण्याचे फक्त एक साधन आहेत. जर देशच टिकत नसेल तर पक्षांचा काय उपयोग? म्हणून, जेव्हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा सर्व पक्षांनी एकत्र काम केले पाहिजे.थरूर यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले होते आणि ऑपरेशन सिंदूरवर सरकार आणि सैन्याचे समर्थन केले होते. यानंतर, त्यांच्या विधानावर काँग्रेस पक्षात नाराजी पसरली होती.