ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन गुरूवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. यावर्षी महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या १९५६७ गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी ११६९५ मूर्ती पीओपीच्या होत्या. तर, ७७८१ मूर्ती शाडू मातीच्या होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला.
गतवर्षी कृत्रिम तलावात ८७०० मूर्तींचे विसर्जन झाले होते. यंदा ही संख्या वाढून १२९७० झाली आहे. तर, खाडी विसर्जन घाटावर गतवर्षी ६५२० मूर्तींचे विसर्जन झाले होते. ती संख्या यंदा ३३८२ एवढी आहे. तसेच, विशेष हौद (टाकी) व्यवस्थेत भाविकांनी गतवर्षी १६२१ मूर्तींचे विसर्जन केले होते. ती संख्या यावर्षी २६१३ एवढी आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण ४९५ गणेश मूर्तींचे तसेच, फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील १०७ गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसजर्न खाडी घाटांवर करण्यात येत आहे. काही भाविकांनी छोट्या मूर्तीही खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला. त्यांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी महापालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार विनंती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, पाचव्या, सातव्या आणि अकराव्या दिवशीही नागरिकांनी सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. कृत्रिम तलाव, फिरते विसर्जन पथक, हौद, स्वीकृती केंद्र येथील सर्व मूर्तींचे विधिवत विसर्जन झाल्यावर पाण्याच्या तळाशी जमणाऱ्या मातीच्या गाळावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या कृती आराखड्यानुसार प्रक्रिया केली जात असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.
१५ टनाहून अधिक निर्माल्य भक्तांनी केले दान : यावर्षी निर्माल्यापासून बायोकंपोस्टिंग पद्धतीने खत करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या खत प्रकल्पात निर्माल्य जमा करण्यात आले. कोलशेत, कौसा, ऋतू पार्क येथे हे प्रकल्प कार्यान्वित आहेत. दीड दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे १५ टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. तसेच निर्माल्यांतील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत. प्लास्टीक, थर्मोकोल यांचे निर्माल्यातील प्रमाण गेल्यावर्षीेपेक्षा कमी झाले आहे.
विसर्जनाची आकडेवारी : – (विर्सजन स्थळ (संख्या) – गणेश मूर्तीची संख्या -(गतवर्षीची संख्या),
कृत्रिम तलाव (२४) – १२९७० -(८७००), खाडी विसर्जन घाट (०९) – ३३८२ -(६५२०), विशेष हौद (टाकी) व्यवस्था (७७) – २६१३ -(१६२१), फिरती विसर्जन व्यवस्था (१५) – १०७ (२७), मूर्ती स्वीकृती केंद्र (१०) – ४९५ -(२४५), एकूण – १९५६७ -(१७११३)
१५ फिरती विसर्जन व्यवस्था : – यावर्षी फिरती विसर्जन व्यवस्था सर्व नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहे. दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रभाग समितीमधील विविध ठिकाणी ठराविक काळासाठी हे फिरते वाहन विसर्जन व्यवस्थेसह उपलब्ध राहील. त्यावरील हौदामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करता येईल. या विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर, ‘पर्यावरणपूरक गणपती विसर्जन व्यवस्था २०२५’ या शीषर्कावर उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच, हरित विसर्जन अॅपवरीही वेळापत्रक उपलब्ध आहे.
हौद (टाकी) व्यवस्था ४९ ठिकाणी :- दोन वर्षांपासून महापालिकेने कृत्रिम तलावांच्या सोबतीने छोट्या हौदांची (टाक्यांची) व्यवस्था विसर्जनासाठी करण्यात येते. त्यानुसार, गेल्यावर्षी ४९ ठिकाणी टाक्यांची सुविधा उपलब्ध होती. ती संख्या यंदा ७७ एवढी करण्यात आली आहे.
१० मूर्ती स्वीकृती केंद्रे :- तसेच, जेल तलाव, मढवी हाऊस-राममारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभी नाका, रिजन्सी हाईट्स-आझादनगर, लोढा लक्झेरिया, कामगार हॉस्पिटल, किसन नगर बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, देवदया नगर-शिवाई नगर या १० ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे आहेत.
२४ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था :- आंबेघोसाळे, मासुंदा दत्त घाट, खारीगाव, घोलाई नगर, दातिवली तलाव, खिडकाळी तलाव, न्यू शिवाजी नगर कळवा तलाव, निळकंठ वूड्स- टिकूजीनी वाडी, रेवाळे, बोरिवडे, ब्रम्हांड ऋतू पार्क, हिरानंदानी रायलादेवी-१, रायलादेवी-२, उपवन तलाव परिसर-वर्तकनगर, देवदयानगर, आत्माराम पाटील चौक आदी २४ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.
०९ ठिकाणी विसर्जन घाट :- त्याचबरोबर, सहा फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींसाठी कोपरी, पारसिक रेती बंदर, रेतीबंदर -१, रेतीबंदर-२-राणानगर, शंकर मंदिर घाट, कोलशेत, बाळकूम आदी ०९ ठिकाणी विसर्जन घाटांची व्यवस्था आहे.