चेन्नई : तामिळनाडूतील तिरुवल्लूर रेल्वे स्थानकावर एक भयानक अपघात घडला. डिझेलने भरलेल्या मालगाडीला अचानक आग लागली. काही वेळातच आग अनेक बोग्यांमध्ये पसरली. ज्यातून मोठ्या ज्वाळा उठू लागल्या. या घटनेमुळे संपूर्ण स्थानकात घबराट पसरली.मालगाडीतील आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आग इतकी भीषण होती की, तीव्र ज्वालांसोबतच संपूर्ण आकाशात धुराचे काळे लोट दिसत होते.
स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच कर्मचारी तातडीने कामाला लागले. अग्निशमन विभाग आणि बचाव पथकाला याची माहिती देण्यात आली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतरही अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणता आली नाही. आगीचे कारण शोधण्यात येत आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रेल्वेच्या बोग्यांमध्ये डिझेल भरलेले होते. आग लागताच डिझेलही जळू लागले, ज्यामुळे आग विझवणे खूप कठीण झाले. ही आग एकामागून एक ४ बोग्यांमध्ये पसरली. ट्रेनमध्ये भरलेले डिझेल जळू लागले.
अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी माहिती मिळताच पोहोचली आणि आग विझवण्यास सुरुवात केली. डिझेलने आग पकडल्याने ती विझवणे हे मोठे आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत, इतर अनेक टीम देखील घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. ही ट्रेन मनालीहून तिरुपतीला जात होती. वाटेत तिरुवल्लूर रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनला आग लागली. प्रशासनाने जवळील नागिकांना स्टेशन रिकामे करण्याचे निर्देश दिले.या घटनेमुळे चेन्नईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्याही थांबवण्यात आल्या आहेत. दक्षिण रेल्वेने ८ गाड्या रद्द केल्या आहेत आणि ५ गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.