नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह प्रकरणी २२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपिठासमोर सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आव्हान दिले होते. याआधी जोपर्यंत यावर न्यायालयात अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत शरद पवार यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह वापरायला दिले होते. एकीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी न्यायालयाने सुनावणीसाठी ऑगस्ट महिन्यात अंतिम तारीख ठरवली असताना राष्ट्रवादी प्रकरणी काही तारीख निश्चित होते का हे पाहणं महत्वाचे आहे.
यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने आपल्या ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी जाहिरातींमध्ये एक प्रकारचा डिस्क्लेमर देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर सुनावणी होणार असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये शरद पवार गटाला कोणते चिन्ह वापरता येणार हे लवकरच स्पष्ट होईल. राष्ट्रवादी काँग्रेसची दोन गटांमध्ये विभागणी झाल्यानंतर पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवार यांच्या गटाकडे आले आहे. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीतही याच चिन्हावर अजित पवार गटाने निवडणूक लढवली होती.