bank of maharashtra

स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ अध्यक्षपदी गजानन किर्तीकर, कार्याध्यक्षपदी श्रीकांत शिंदेंची नियुक्ती

0

स्थानिकांना न्याय देण्यासाठी स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ पुन्हा जोमाने उभी राहणार – एकनाथ शिंदे

मुंबई : स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते माजी खासदार गजानन किर्तीकर, कार्याध्यक्षपदी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ स्थापनेचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. “स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ पुन्हा जोमाने उभी करणार आहोत. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थानिकांच्या हक्कासाठी निर्माण केलेली ताकद नव्याने संघटित करून प्रत्येक क्षेत्रात न्याय मिळवून देणार आहोत,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ, नेत्या मीनाताई कांबळी आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे म्हणाले, “निवडणुकीमध्ये स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचा कार्यकर्ता असला की उमेदवाराचा अर्ज बिनचूकपणे भरता येतो. निवडणुकांमध्ये देखील स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचा भाग महत्त्वाचा असतो. बाळासाहेब ठाकरे यांनी यासाठी मोठी ताकद निर्माण केली होती, त्यांच्या विचारांनुसारच आपण पुढे चाललो आहोत.”

“स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ पुन्हा सुरू करण्याच्या सूचना गजानन कीर्तिकर यांना दिल्या होत्या. आज पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. केंद्रीय आस्थापना, बँका, ऑइल कंपन्या, रेल्वे तसेच शासकीय आणि निमशासकीय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार असतात. अशा युनियनच्या मागे खासदार असतील तर त्या कामगारांना निश्चित न्याय मिळतो. शिवसेना देणारी आहे, घेणारी नाही. पूर्वीचे कामकाज सर्वांनी पाहिले आहे, त्यावर मी काही बोलू इच्छित नाही,” असे शिंदे म्हणाले.

पूरग्रस्तांना मदतीबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “पूरग्रस्तांना मदतीसाठीच्या ट्रक्सना नुकताच हिरवा झेंडा दाखवला आहे. मेळाव्याच्या दिवशी देखील आपण मोठ्या प्रमाणावर मदत वाटप केले. आपली बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे. कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. अटी-शर्ती बाजूला ठेवून आम्ही शेतकऱ्यांना भरी मदत केली आहे. ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज आपण शेतकऱ्यांसाठी जाहीर केले आहे.” ते पुढे म्हणाले, “रमाबाई आंबेडकर नगरमध्ये १७ हजार घरांचा प्रकल्प उभारत आहोत. मुख्यमंत्री असताना लोकांना १६० कोटी रुपयांचे भाडे दिले होते. लवकरच भूमिपूजन करण्यात येईल. एसआरए आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रकल्प पूर्ण केला जाईल.” “आम्ही रस्त्यावर उभे राहून रस्ते धुतले, पण काहींनी तिजोरी धुतल्या आहेत,” असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

“गेल्या तीन वर्षांत राज्याचा विकास झपाट्याने होत आहे. मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करीत आहोत. येत्या दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होईल. प्रत्येक वॉर्डमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे. कॅशलेस सेवा सुरू केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न असलेल्या घरकुल योजनेअंतर्गत १४ हजार घरे बांधली जात आहेत,” असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे, रोजगार निर्मिती होत आहे. जीडीपी आणि स्टार्टअपमध्ये आपण नंबर एक आहोत. सरकारी नोकरभरती पुन्हा सुरू केली असून, नुकत्याच १० हजार जणांना नोकऱ्या दिल्या आहेत. पुढील वर्षी आणखी १० हजार लोकांना नियुक्तीपत्र दिली जातील.” “बाळासाहेब ठाकरे म्हणायचे नोकऱ्या मागणारे नव्हे तर नोकऱ्या देणारे हात निर्माण करा. म्हणून आपण उद्योजक तयार करत आहोत. टाटा कंपनीसोबत जॉईंट वेंचर केले आहे. गडचिरोली, कल्याण, पुणे येथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले असून, नाशिकमध्येही सुरू होणार आहे,” असे ते म्हणाले.

शेवटी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “नवीन जीएसटी स्लॅबचा फायदा सर्वसामान्यांना होत आहे. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, काम करणारा पुढे जातो. माझे हात कायम भरलेले आहेत, इतरांसारखे रिकामे नाहीत. नवे स्वप्न, नवे पंख, नवी उमेद घेऊन सर्वांनी कामाला लागा. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे, आणि स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ पुन्हा जोमाने उभी करायची आहे.”

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech