bank of maharashtra

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत “आशा” चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग संपन्न

0

मुंबई : महिलांच्या सामर्थ्याचा आणि आशा सेविकांच्या निःस्वार्थ कार्याला प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा, दिग्दर्शक दीपक पाटील, निर्माते दैवता पाटील आणि निलेश कुवर यांनी केलेल्या प्रयत्नाला जवळपास ५०० आशा आणि अंगणवाडी सेविकांनी भरभरून दाद दिली. यावेळी निर्मात्या दैवता पाटील म्हणाल्या, “एखादी स्त्री जेव्हा घराच्या चौकटीबाहेर पाऊल टाकते, तेव्हा तिला असंख्य अडचणींना सामोरे जावं लागतं — कधी घराबाहेरचा विरोध, तर कधी घराच्या आतलाच संघर्ष. तरीही ती थांबत नाही. प्रत्येक अडथळा ओलांडत, ती स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत पुढे जाते. ‘आशा’ चित्रपटातील नायिकाही अशीच आहे, आशा सेविका म्हणून काम करत असली, तरी ती हे फक्त नोकरी म्हणून करत नाही, तर तिच्यासाठी ते एक आवड आणि ध्यास आहे. म्हणूनच तिची कहाणी ही फक्त एका आशा सेविकेची राहत नाही, तर ती प्रत्येक स्त्रीची कहाणी बनते… बाईपणाच्या संघर्षाची आणि सामर्थ्याची गोष्ट ठरते.”

“आशा” या चित्रपटाला ६१ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री या विभागांत पारितोषिके मिळाली आहेत.आरोग्यसेविकांच्या सेवाभावावर आधारित हा चित्रपट महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि संघर्षाचा हृदयस्पर्शी प्रवास दाखवतो. पुरस्कार विजेते दिग्दर्शक दीपक पाटील म्हणाले, “सध्या मराठी सिनेमा नव्या वाटा शोधत आहे. विविध आणि आशयपूर्ण विषयांवर चित्रपट निर्माण होत आहेत, आणि प्रेक्षकही या नव्या प्रवाहाला मनापासून दाद देत आहेत. एका शिबिरादरम्यान आशा सेविकांचं काम जवळून पाहण्याची संधी मिळाली, तेव्हा मनात विचार आला, अरे, या कामामागचं जग किती मोठं आणि महत्त्वाचं आहे! यावर तर नक्कीच एक चित्रपट व्हायला हवा.

ही खरं तर एका वेगळ्या जगाची गोष्ट आहे. आपल्या समाजातच राहणारा हा एक वर्ग पण ज्याच्या आयुष्याबद्दल, संघर्षाबद्दल आणि त्यागाबद्दल आपल्याला फारसं माहिती नसतं. ‘आशा’ या चित्रपटाच्या माध्यमातून ती गोष्ट पहिल्यांदाच जगासमोर येणार आहे. ‘आशा’ हा सिनेमा फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाही, तर घर सांभाळून, स्वतःची ओळख शोधणाऱ्या, प्रसंगी त्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आहे. तिच्या स्वप्नांचा, तिच्या जिद्दीचा आणि तिच्या न थकणाऱ्या प्रवासाचा आहे. मराठी प्रेक्षकांनी नेहमीच नव्या विषयांना आणि प्रामाणिक कथांना उघड मनाने स्वीकारलं आहे. म्हणूनच, ही वेगळी, अनोखी आणि भावस्पर्शी कहाणीही त्यांच्या मनाला नक्कीच भिडेल, असा विश्वास वाटतो.”

या सोहळ्यास डॉ. श्रीकांत शिंदे (खासदार, शिवसेना) श्री. प्रतापराव जाधव (केंद्रीय राज्य मंत्री – आयुष आणि आरोग्य व कुटुंब कल्याण) आणि शायना एन.सी. (राष्ट्रीय प्रवक्त्या, शिवसेना) उपस्थित होते. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमाने महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान केला. ह्यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, ” चित्रपट हे समाजप्रबोधनाचं एक प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे. समाजातील विविध प्रश्न, भावना आणि संघर्ष जर चित्रपटाच्या माध्यमातून मांडले गेले, तर त्यातून दिला जाणारा संदेश नक्कीच लोकांच्या मनापर्यंत पोहोचतो.

समाजात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद सिनेमात आहे आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘आशा’ हा चित्रपट. दिग्दर्शक दीपक पाटील आणि निर्माते निलेश कुवर आणि दैवता पाटील यांनी समाजातील अत्यंत महत्त्वाचा पण आजवर दुर्लक्षित राहिलेला घटक आशा सेविका यांच्या जीवनावर हा चित्रपट साकारला आहे. आपल्या गावखेड्यात आरोग्यसेवा, जनजागृती आणि समाजहितासाठी अखंड झटणाऱ्या या महिलांची कहाणी पहिल्यांदाच चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. या सुंदर उपक्रमाबद्दल आणि संवेदनशील प्रयत्नाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक.”

चित्रपटात मुख्य भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी रिंकू राजगुरू समवेत सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, हर्षा गुप्ते, आणि दिलीप घारे यांचा समावेश आहे. चित्रपटाचे लेखन अंतरिक्ष श्रीवास्तव आणि दीपक पाटील यांनी केले आहे तर दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील सुरेश सारंगम यांनी कॅमेराची धुरा सांभाळली आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech