bank of maharashtra

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-चिन्हाबाबत २१ जानेवारीला एकत्रित सुनावणी

0

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उबाठा) यांनी पक्ष व चिन्हाबाबत दाखल केलेल्या दोन्ही याचिकांमधील मुद्दे समान आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेण्यास अखेर सहमती दर्शविली. या विषयांवरील पुढील सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून खरी शिवसेना कोणती आणि खरी राष्ट्रवादी कोणती?, या महाराष्ट्रासह देशासमोर निर्माण झालेल्या पेचाचे उत्तर मिळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष-चिन्ह प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी दोन-दोन तासांचा वेळ देण्यात आला आहे. सुनावणी सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे.

निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ पक्ष आणि चिन्ह दिल्याच्या निर्णयाला शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तर दुसरीसडे अजित पवार गटाला मूळ पक्ष आणि चिन्ह दिले होते. त्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाकडून आव्हान देण्यात आले होते. या दोन्ही सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने बुधवारी (१२ नोव्हेंबर) पुढील सुनावणीपर्यंत हे प्रकरण पुढे ढकलले. आवश्यक असल्यास २२ जानेवारी रोजी सुनावणी सुरू ठेवण्याची परवानगी देऊन, दुसऱ्या दिवशी इतर कोणत्याही तातडीच्या बाबींची यादी करू नये, असे निर्देशही दिले. शिवसेना (उबाठा) कडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत, तर दुसऱ्या बाजूने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि एन.के. कौल उपस्थित राहिले.

‘कोर्ट इज ऑन ट्रायल’ – वकील असीम सरोदे
दरम्यान ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी न्यायालयाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘कोर्ट इज ऑन ट्रायल’ असं म्हणायला पाहिजे. कोर्टाचीच आता ट्रायल आहे की ते किती लवकर या संदर्भातील निर्णय देतात, असे मत सरोदे यांनी व्यक्त केले आहे. यासोबतच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रकरणावरही सुनावणी होणार असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech