bank of maharashtra

प्रत्येकाला विश्वासात घेऊनच शक्तिपीठ महामार्ग होणार – नितेश राणे

0

महामार्गाचा सध्याचा प्लॅन १०० टक्के बदलणार, पालकमंत्री म्हणून प्रत्येकाशी संवाद साधण्यास मी तयार

सिंधुदुर्ग : सर्वाना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्ग होणार आहे. सध्याचा जो शक्तीपीठ महामार्गाचा प्लॅन आहे तो सिंधुदुर्गसाठी उपयोगाचा नाही. हा प्लॅन शंभर टक्के बदलण्यात येईल आणि झाराप झिरो पॉईंट किंवा मळगाव येथे हा महामार्ग निघेल असा प्लॅन बनविण्यात येईल, अशी माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. सिंधुदुर्गनगरी इथं ते माध्यमांशी बोलत होते. पालकमंत्री नितेश राणे पुढे म्हणाले, शक्तिपीठ संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली आहे. तसेच कालच मी एमएसआरडीसी डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी ही माझी चर्चा झाली आहे.

सर्वात प्रथम सिंधुदुर्गच्या आणि त्या भागातल्या ज्या-ज्या लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतोय त्यांना मी स्पष्ट भूमिका घेत राज्य सरकारची सांगेन की, प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच हा महामार्ग होणार आहे. खासदार राणे आणि जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दोन आठवड्यापूर्वी आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्येच आम्ही स्पष्ट भूमिका संबंधित एमएसआरडीसी आणि अन्य लोकांना सांगितली आहे. लोकांना विश्वासात घेतल्यानंतर निर्णय घेऊ. आम्हाला पर्यायी दोन-तीन मार्ग दाखविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कारण आता असलेल्या महामार्गाचा जो काही प्लॅन आहे त्याच्यामध्ये आमचे बांदा शहर आणि काही भाग बाधित होत आहेत किंवा बाजारपेठ बाधित होते आणि म्हणून आम्ही सांगितले की, या गोष्टी आम्हाला चालणार नाहीत.

हा महामार्ग जर गोव्यात निघत असेल तर त्याचा महाराष्ट्राला काय फायदा? सिंधुदुर्गाला याचा फायदा व्हावा म्हणून आत्ता असलेला जो काही प्लॅन आहे तो आम्ही १०१ टक्के बदलणारच आहे. त्यासंबंधी कॅबिनेट मध्ये पण आमची चर्चा झाली. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण चर्चा झाली आणि नंतर जे पर्यायी दोन मार्ग सुचवलेले आहेत त्यानुसार तो झिरो पॉईंट किंवा मळगाव या काही भागांमध्ये तो शक्तीपीठ हायवे तिथून बाहेर निघू शकतो आणि तिथून मग कोस्टल रोड असो, रेडी असो आणि अन्य विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले जे मार्ग आहेत तिथून निघेल. त्यामुळे कोणाचेही मोठे नुकसान होणार नाही.

काही लोकांची शेती अगर जमीन जात असेल त्याच्याही योग्य पद्धतीने मोबदला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तो दिला जाईल. पण आत्ता जो करंट प्लान आहे तो एकशे एक टक्के आम्ही बदलणार आहोत. तो आताचा प्लॅन राहणार नाही, आमदार दीपक केसरकर यांनी पण कालच मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे. आमची जी काही भूमिका आहे तीच भूमिका केसरकर यांच्यासह आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि म्हणूनच जे कोण विरोध करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि जी काही नौटंकी सुरू आहे ती थांबवावी. आम्ही लोकांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत. लोकांनी आम्हाला ८, ९ महिने अगोदरच आमच्या बाजूने मतदान केलेले आहे आणि म्हणूनच लोकांची चिंता आम्हाला जास्त आहे.

लोकांचा विश्वास आमच्यावर जास्त आहे. ज्यांना लोकांनी नाकारलेला आहे. त्यांनी लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करू नये. तरीही त्यांचे पण काही प्रश्न असतील तर त्यांच्याशी संवाद करायला मी स्वतः पालकमंत्री म्हणून तयार आहे. आम्हाला तिथले वातावरण खराब करायचं नाही. उगाच कुठलाही पोलीस बळाचा वापर करायचा नाही. जे आंदोलन करत आहेत, काही त्यांची शिष्टमंडळ आहेत. किंवा समिती केली असेल तर समितीने पालकमंत्री म्हणून माझ्याशी येऊन बोलावे, त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी तयार आहे. आमची भूमिका पारदर्शक आहे.

नॅशनल हायवे तयार झाला आहे. त्याप्रमाणे हा शक्तिपीठ हायवे पण लोकांच्या विकासासाठी केला जाईल आणि म्हणून तो मार्ग गोव्याकडे न जाता आता मळगांव किंवा झिरो पॉईंट असा आम्ही सुचवणार आहोत आणि मान्य करून घेण्याची जबाबदारी ही आमची असेल म्हणून याबाबतीमध्ये कुठलाही विरोध करण्याची काही गरज नाही. कोणालाही संवाद करायचा असेल तर मी कधीही त्याच्यासाठी तयार आहे, असे स्पष्ट मत पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech