ओझर येथील कार्यक्रमात तेजससह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित
नाशिक : नाशिकची भूमी अध्यात्मिकतेबरोबरच आत्मनिर्भरतेचे प्रतिक असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत आत्मनिर्भर होऊन बलशाली होण्यासाठी या भूमीतील हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ओझर (नाशिक) येथील प्रकल्पात एलसीए एमके 1एची (तेजस) तिसरी उत्पादन साखळी आणि एचटीटी ४० या प्रशिक्षणार्थी विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचा शुभारंभ आज सकाळी संरक्षण मंत्री सिंह यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, एचएएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी. के. सुनील, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव संजीवकुमार आदी उपस्थित होते.
संरक्षण मंत्री श्री. सिंह म्हणाले की, एचएएलच्या ओझर प्रकल्पात मिग, सुखोई ३०, तेजस आणि प्रशिक्षणार्थी विमानांची निर्मिती होऊन त्यांनी अवकाशात घेतलेले उड्डाण हे देश आणि संरक्षण विभागासाठी अभिमानाची बाब आहे. हे केवळ गौरवाचे उड्डाण नसून आत्मनिर्भर भारताचे उड्डाण आहे. गेल्या सहा दशकांपासून कार्यान्वित एचएएल संरक्षण उत्पादनांसाठी महत्वाचे आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत देशाला संरक्षण उत्पादनांबाबत परकीय देशांवर अवलंबून राहावे लागत असे. ६५ ते ७० टक्के साहित्य आयात केले जात असे. आता या परिस्थितीत बदल होत आहे. आता ६५ टक्के साहित्य देशातच तयार होत आहे. लवकरच सर्व साहित्य देशांतर्गत तयार करण्यात येईल. एचएएलने विविध संस्थांच्या सहकार्याने उत्पादित केलेले लढाऊ विमाने ही देशासाठी गौरवाची बाब आहे. देशाचे हवाई दल नवीन तंत्रज्ञानाच्या विमानांमुळे अधिक मजबूत होईल.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश संरक्षण साहित्य उत्पादनात स्वयंपूर्ण आणि सक्षम होत आहे. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी झाले. देशांतर्गत संरक्षण उत्पादनांचे मूल्य २०२९ पर्यंत तीन लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे देशाचे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. तसेच संरक्षण उत्पादनांचे निर्यात मूल्य सन २०२९ पर्यंत दुप्पट म्हणजे ५० हजार कोटी रुपयांपर्यंत करण्याचे ध्येय आहे. ते निश्चितपणे साध्य केले जाईल. गेल्या १० वर्षांत भारताने गतीने संरक्षण उत्पादन क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळे लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, यंत्र, लढण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक साधनांची निर्मिती भारतातच होत आहे. मेक इन इंडियांतर्गत स्थानिक उत्पादकांना प्रेरणा देण्याचे काम सुरू आहे. त्याचाही लाभ होत आहे. यामुळे स्थानिक उद्योजकांनाही पाठबळ मिळत आहे.
सध्या युद्धनीतीत बदल होत आहेत. वेगवेगळ्या पातळ्यांवर लढाया लढल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर, ड्रोन सिस्टिम आणि नेक्स्ट जनरेशनमधील विमाने भविष्यातील लढायांची दिशा निश्चित करतील. एचएएलमध्ये निर्मित मिग २१ विमानांची देशांच्या सीमांचे संरक्षण केले. त्यात एचएएलचे योगदान उल्लेखनीय आहे, असे सांगत त्यांनी अलिकडेच राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस एचएएलने पूर्ण क्षमतेने काम केले. या काळात त्यांनी २४ तास सेवा बजावली, असे सांगत एचएएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मंत्री श्री. सिंह यांनी कौतुक केले. तसेच एचएएलने खासगी क्षेत्राच्या सहकार्याने जागतिक पातळीवर दर्जेदार उत्पादनांची निर्मिती करीत आहे. हा परिसर डिजिटल आणि पेपरलेस आणि परिपूर्ण शाश्वत झाला आहे, असा मला विश्वास आहे, असे सांगत त्यांनी एचएएलने स्वीकारलेल्या नवतंत्रज्ञान व गुणवत्तेचे कौतुक केले. तेजस आणि प्रशिक्षणार्थी विमानाच्या निर्मितीमुळे परिसरातील अनेकांना रोजगाराची उपलब्धता झाली आहे. तसेच आगामी काळात नागरी आणि सैन्य दलाच्या विमानांची दुरुस्ती, व्यवस्थापन आणि ओव्हरऑलची सुविधा यामुळे या दोन्ही क्षेत्रात भारताची विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
संरक्षण सचिव संजीवकुमार, एचएएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील यांनी मनोगत व्यक्त करताना एचएएलच्या माध्यमातून देशसेवेत बजावण्यात येणाऱ्या कामगिरीची माहिती देत आगामी काळात ही सेवा अखंडपणे सुरूच राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी वैमानिक के. के. वेणुगोपाल, प्रत्युष अवस्थी यांनी तेजस आणि एचटीटी ४० या विमानांच्या थरारक कसरती सादर करीत संरक्षण मंत्री श्री. सिंग यांना सलामी दिली. हिंदुस्थान एरॉनॉटिकल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांनी आभार मानले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह सैन्य दल, वायू दलातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन व एचएएलचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी, विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.