• महसूल सेवकांच्या प्रश्नावर महसूलमंत्र्यांचे आश्वासन
• मंत्रालयात मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक
• महसूल सेवकांच्या प्रश्नावर तातडीने मार्ग काढण्याचा प्रयत्न
मुंबई : महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करुन त्यांना मानधनाऐवजी वेतनश्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकांची मागणी होती. याबाबत महसूलमंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. वेतनश्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्दावर सकारात्मक चर्चा झाली. महसूल सेवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासनही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
महसूल सेवकांच्या प्रश्नाबाबत महसूलमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव राजेश मिना, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव सचिव ओमप्रकाश गुप्ता, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आणि महसूल सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्र बावनकुळे यांनी महसूल सेवकांचे उपोषण सोडविताना त्यांचे प्रश्नही प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणी लागू करण्याबाबत तरतूद नसल्याचा मुद्दा चर्चेला आला. त्यामुळे त्याला पर्यायी व्यवस्था करण्यासाठी महसूलमंत्र्यांनी पुन्हा राज्याचे मुख्य सचिव राजेश मिना यांच्या कार्यालयात बैठक घेतली.
या बैठकीमध्ये महसूलमंत्र्यांनी महसूल सेवकांना वेतन श्रेणी देता येत नसली तरी त्यांच्या सेवेचा आणि अनुभवाचा विचार करुन त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवण्याचा मुद्दा मांडला. त्याबरोबरच ज्यांना पाच वर्षांचा महसूल सेवकाचा अनुभव आहे. त्यांना २५ गुण अतिरिक्त देण्याच्या मुद्दावरही चर्चा झाली. याबाबत अधिकाऱ्यांनीही सकारात्मकता दर्शविली असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
महसूल सेवकांच्या इतर प्रश्नांवरही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,असे आश्वासनही महसूलमंत्र्यांनी बैठकीवेळी दिले. महसूल सेवकांना यापूर्वीच मानधन वाढ देण्यात आली आहे. त्याबरोबरच त्यांच्या प्रश्नांना सरकार कायम प्राधान्य देत असते. सध्या ऑनलाईन पद्धतीने सर्व सेवा देण्यात येत असल्याने महसूल सेवकांचे बरेच काम कमी झाले आहे. पूरस्थितीच्या काळात अनेक महसूलसेवक संपावर होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. याचाही महसूल सेवकांनी विचार करायला हवा, अशीही चर्चा बैठकीवेळी झाली.