चंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २८ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण ठरविण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार, आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरीता प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२५ पासून ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पार पाडण्यात येणार आहे. यानंतर आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रांमधून ८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. आरक्षणाची सोडत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी काढण्यात येणार असून, त्याचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल.
त्यानंतर प्रारुप आरक्षण प्रसिद्ध करून, नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू होईल. हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ असा निश्चित करण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करून संबंधित महानगरपालिका आयुक्त निर्णय घेतील. आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात २ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. राज्य निवडणूक आयोगाने संबंधित सर्व महानगरपालिका आयुक्तांना या कार्यक्रमानुसार वेळेत आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता व काटेकोरता राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
