मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला असून, सरकारला यावरून मोठ्या जबाबदारीची आठवणही करून दिली आहे. या १२ किल्ल्यांपैकी ११ महाराष्ट्रात तर एक जिंजीचा किल्ला तामिळनाडूमध्ये आहे. याबाबत राज ठाकरे म्हणाले, “ही बाब अत्यंत गौरवास्पद असून महाराजांनी रुजवलेल्या स्वराज्याच्या विचारांची व्याप्ती किती विस्तृत होती, याचा हा पुरावा आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यातील भाषिक आणि सांस्कृतिक सेतुबंध किती जुना आणि मजबूत आहे, हे यामुळे दिसून येते.”
राज ठाकरे यांनी युनेस्को दर्ज्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या अधोरेखित करत म्हटले, “युनेस्कोच्या निकषांनुसार आता या गडकिल्ल्यांचं नीट संवर्धन, देखभाल आणि नूतनीकरण करणं बंधनकारक होईल. त्यामुळे या वास्तू नीट राखल्या जातील, ही अपेक्षा आहे. आतापर्यंत सर्वच सरकारांनी गडकिल्ल्यांची दुरवस्था केली होती. त्यामुळे आपलं हे ऐतिहासिक वैभव जगासमोर सादर करायची संधीच मिळाली नव्हती. आता ती स्थिती बदलेल अशी आशा आहे.” ते पुढे म्हणाले की, “महाराजांनी उभारलेले हे किल्ले आणि महाराष्ट्राची विस्तृत किनारपट्टी यांचे नीट जतन करून पर्यटनाच्या दृष्टीने योग्य सुविधा दिल्या तर राज्याची अर्थव्यवस्था गगनाला भिडू शकते. मात्र युनेस्कोने दिलेला दर्जा गृहीत न धरता त्याच्या सर्व अटींचं पालन होणं आवश्यक आहे.”
राज ठाकरे यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला की, “युनेस्कोने दिलेला दर्जा कायम ठेवण्यासाठी कठोर निकष पाळावे लागतात. अन्यथा ओमानमधील आवरिक्स अभयारण्य आणि जर्मनीतील ड्रेस्डन व्हॅलीप्रमाणे दर्जा मागे घेण्याची वेळ येऊ शकते.” शेवटी राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितले, “या किल्ल्यांवर असलेली सर्व अनधिकृत बांधकामं तात्काळ पाडा. यात जात, धर्म पाहू नका. ही आपली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संपत्ती आहे. तिचं जतन करणं हे प्रत्येक सरकारचं कर्तव्य आहे.” पुन्हा एकदा मराठी जनतेचे अभिनंदन करत, राज ठाकरे यांनी जागतिक पातळीवर शिवरायांचा वारसा अधिक भक्कम करण्याची प्रेरणा दिली आहे.