लंडन : भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदाने लंडन बुद्धिबळ क्लासिक ओपन २०२५ मध्ये आपली प्रभावी कामगिरी सुरू ठेवली आणि त्याने स्पर्धेत आघाडीही घेतली आहे. सहाव्या फेरीत त्याने ५/६ गुण मिळवले आहेत आणि सध्या तो सर्बियन ग्रँडमास्टर वेलिमिर इविकसह संयुक्तपणे अव्वल स्थानी विराजमान आहे. प्रज्ञानंदाने दिवसाची सुरुवात हंगेरियन ग्रँडमास्टर टॉमस फोडोस ज्युनियर विरुद्ध फक्त २१ चालींमध्ये बरोबरी साधून केली. पण दुसऱ्या सामन्यात त्याने इस्रायली आंतरराष्ट्रीय मास्टर एयटन रोसेनला पराभूत करून उल्लेखनीय पुनरागमन केले. त्याचा पुढचा सामना वेलिमिर इविक विरुद्ध असेल, जो स्पर्धेतील एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो.डिसेंबर २०२५ च्या नवीनतम FIDE रेटिंग यादीमध्ये, प्रज्ञानंदाने काही रेटिंग पॉइंट गमावले असूनही त्याचे जागतिक क्रमांक ७ वे रँकिंग कायम आहे.
दरम्यान, आणखी एक तरुण भारतीय स्टार अरुण एरिगाईसीने शानदार कामगिरी करत ६.४ एलो गुण मिळवत जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानावर पोहोचला. दुसरीकडे, २०२५ च्या विश्वचषकात तिसऱ्या फेरीतून बाहेर पडल्यानंतर विद्यमान विश्वविजेता डी. गुकेशला रँकिंगमध्ये घसरण झाली आणि आता तो टॉप १० मध्ये १० व्या स्थानावर घसरला आहे. सध्या, जगातील टॉप ३० खेळाडूंमध्ये फक्त पाच भारतीय आहेत. पेंटाला हरिकृष्णाने वर्ल्ड कपमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत ३ एलो गुण जोडले. प्रणव वेंकटेशनेही स्थिर कामगिरीसह आपले रेटिंग कायम ठेवले.महिला गटात, चार भारतीय खेळाडू टॉप २० मध्ये कायम आहेत. हम्पी कोनेरू एकही सामना न खेळता जागतिक क्रमवारीत ५ व्या स्थानावर पोहोचली आहे. दिव्या देशमुख रेटिंगमध्ये घसरण होऊन जागतिक क्रमवारीत बाराव्या स्थानावर घसरली आहे. पद्मिनी राउत आणि सविता श्री बी यांनीही सकारात्मक कामगिरीसह एलो गुण मिळवले आहेत.
