चंदीगड : आसामच्या डिब्रूगढ जेलमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) अंतर्गत बंदिस्त असलेला खडूर साहिबचा अपक्ष खासदार अमृतपाल सिंग याने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी मागितलेली तात्पुरती पॅरोल पंजाब सरकारने नाकारला आहे. अमृतपाल यांने २१ नोव्हेंबर रोजी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात १ ते १९ डिसेंबरपर्यंतच्या पॅरोलसाठी याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य सरकारच्या गृह सचिवांना आणि अमृतसरच्या उपायुक्तांना (डीसी) एक आठवड्याच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अमृतसरच्या डीसी आणि जिल्हा पोलिसांच्या अहवालाच्या आधारे पंजाब सरकारने पॅरोल मंजूर करण्यास नकार दिला.सूत्रांच्या माहितीनुसार, अमृतपाल याला तात्पुरते जेलमधून सोडल्यास राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते, असे सरकारचे मत आहे. याच कारणामुळे त्यांच्या पॅरोल याचिकेला नकार देण्यात आला आहे.
