bank of maharashtra

सेंगरला जामीन मंजूर केल्याच्या विरोधात हायकोर्टाबाहेर निदर्शने

0

नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी आणि माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर यांची शिक्षा निलंबित करून त्यांना जामीन मंजूर करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शुक्रवारी पीडितेचे कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर निदर्शने केली. निदर्शकांनी स्पष्ट भूमिका घेतली की, सेंगरला कोणत्याही परिस्थितीत दिलासा मिळू नये. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील आणि गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयातही दाद मागण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. उन्नाव बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या भाजपच्या माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने ४ अटींवर जामीन मंजूर केला आहे. मात्र, बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी त्यांना ठोठावण्यात आलेल्या दहा वर्षांच्या शिक्षेमुळे सेंगर सध्या तुरुंगातच राहणार आहे. या प्रकरणातील जामीन अर्जावर २८ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बलात्कार पीडिता, तिची आई आणि सामाजिक कार्यकर्त्या योगिता भयाना यांनी २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी इंडिया गेट परिसरात धरणे आंदोलन केले होते. मध्यरात्री पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलन थांबवण्याचे आदेश दिले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला. अखेरीस पोलिसांनी पीडिता व तिच्या आईसह तिघींना तेथून हटवले होते. दरम्यान आज, शुक्रवारी पीडितेच्या आईने यावेळी तीव्र भावना व्यक्त करताना सांगितले की, सेंगरचा जामीन तात्काळ रद्द केला पाहिजे. आम्हाला न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे लागले, तरी आम्ही मागे हटणार नाही. उच्च न्यायालयावरील आमचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यांनी पतीच्या हत्येतील दोषींवर कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना येथे आंदोलन करणे कायद्याने निषिद्ध असल्याचा इशारा दिला. आंदोलन करायचे असल्यास जंतर-मंतर येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. या पार्श्वभूमीवर दिल्ली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली मेट्रो परिसरात निषेध व्यक्त केला. हातात फलक घेऊन त्यांनी कुलदीप सेंगर दोषी असूनही त्यांना जामीन मिळाल्याचा विरोध केला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech