नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि.२९) जपानच्या नव्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी त्यांना पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. ६४ वर्षीय ताकाइची या अलीकडेच जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांनी शिगेरू इशिबा यांच्या पद त्यागानंतर ही जबाबदारी स्वीकारली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले, “जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांच्याशी सौहार्दपूर्ण चर्चा झाली. त्यांना पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले आणि भारत-जपान यांच्या विशेष सामरिक व जागतिक भागीदारीला पुढे नेण्यासाठी आमच्या सामायिक दृष्टीकोनावर चर्चा झाली.” ते पुढे म्हणाले, “या चर्चेत आर्थिक सुरक्षा, संरक्षण सहकार्य आणि प्रतिभा विनिमय यांसारख्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. आम्ही या मतावर एकमत आहोत की मजबूत भारत-जपान संबंध जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहेत.”
