bank of maharashtra

पंतप्रधान मोदींचं ब्राझीलमध्ये जल्लोषात स्वागत

0

नवी दिल्ली / ब्रासीलिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. ते रविवारी अर्जेंटिनाहून ब्राझीलला पोहोचले.येथे पोहोचल्यावर भारतीय समुदायाकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले. ब्राझीलमध्ये पोहचल्यावर पंतप्रधान मोदींचं पारंपरिक नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणं करून स्वागत करण्यात आले. तेथील भारतीय लोकांनी हातात तिरंगा घेऊन मोदींचं स्वागत केलं. या स्वागतात सर्वात खास ठरले ते ‘ऑपरेशन सिंदूर’ चे सादरीकरण. हे सादरीकरण भारताकडून पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या निर्णायक लष्करी मोहिमेवर आधारित होते. नृत्य आणि चित्रांच्या माध्यमातून हे दृश्य उभं करण्यात आले होते.

प्रवासी भारतीयांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत पेंटिंग्स आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ आधारित नृत्य सादरीकरणाच्या माध्यमातून केलं. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात भाग घेतलेल्या भारतीय महिला नृत्यांगनांशी संवाद साधला. नृत्यांगनांपैकी एका कलाकाराने सांगितलं, “पंतप्रधान मोदी आमच्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत. त्यांचं इथे येणं ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांनी आमचं सादरीकरण फार संयमाने पाहिलं, आम्हाला भेटले आणि खूप कौतुक केलं. आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’ ही संकल्पना निवडली कारण आमच्या शूर सैनिकांना मानवंदना द्यायची होती आणि भारत मातेचा गौरव करायचा होता.”

दरम्यान , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमधील भारतीय समुदायाने रिओ डी जानेरियो येथे दिलेल्या उत्स्फूर्त स्वागताबद्दल त्यांचे कौतुक केले तसेच मोदींनी स्वागताचे काही झलकाही शेअर केल्या. पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्टमध्ये म्हंटलं की, “ब्राझीलमधील भारतीय समुदायाने रिओ डी जानेरियोमध्ये अतिशय ऊर्जावान स्वागत केले. भारतीय संस्कृतीशी त्यांची असलेली नाळ आणि भारताच्या विकासाबद्दलची त्यांची उत्कटता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे! स्वागताच्या काही झलक येथे शेअर करत आहे…”

पंतप्रधान मोदी ब्राझीलच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असून, ६ आणि ७ जुलै रोजी ते रिओ डी जेनेरियो येथे होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते अधिकृत राजकीय भेटीसाठी ब्रासीलिया येथे जातील. सुमारे सहा दशकांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा हा देशातील पहिला द्विपक्षीय दौरा आहे. या राजकीय दौर्‍यात पंतप्रधान मोदी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुइझ इनासियो लूला दा सिल्वा यांच्याशी भेट घेणार असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान, शेती, आरोग्य आणि जनतेतील परस्पर संपर्क या विषयांवर चर्चा होणार आहे. दोन्ही देशांतील धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरेल.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech