हैदराबाद : मंगोलियाचे राष्ट्रपती खुरेलसुख उखना हे सध्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर दिल्लीमध्ये आहेत. याच दरम्यान, मंगळवारी (१४ ऑक्टोबर) हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे राष्ट्रपती उखना यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली, ज्यामध्ये दोन्ही देशांमध्ये विविध करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “मंगोलियाचे राष्ट्रपती आणि त्यांचे शिष्टमंडळ भारतात आले याचा मला अत्यंत आनंद आहे. मंगोलियाच्या राष्ट्रपतींचा ६ वर्षांनंतरचा भारत दौरा हा स्वतःमध्ये एक विशेष प्रसंग आहे.”
संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले,“भारत आणि मंगोलिया यांचे राजनयिक संबंध ७० वर्षांचे आणि सामरिक भागीदारी १० वर्षांची पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही एक संयुक्त पोस्टल स्टॅम्प प्रकाशित केला आहे, जो दोन्ही देशांच्या सांस्कृतिक वारसा, विविधता आणि खोल सभ्यता संबंधांचे प्रतीक आहे.” त्यांनी सांगितले की, “संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील आमचे सहकार्य सातत्याने बळकट होत आहे. भारत मंगोलियाच्या सीमा सुरक्षा दलांसाठी नवीन क्षमतावृद्धी कार्यक्रम सुरू करणार आहे.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “जरी भारत आणि मंगोलियाच्या सीमा एकमेकांशी जोडलेल्या नसल्या, तरी भारताने मंगोलियाला नेहमी एक प्रमुख शेजारी देश मानले आहे. आम्ही नागरिकांमधील संबंध अधिक मजबूत करत राहू. या अनुषंगाने मोदींनी मंगोलियाच्या नागरिकांसाठी मोफत ई-व्हिसा सुविधा देण्याचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, “भारत आणि मंगोलिया यांच्यात आत्मीय आणि आध्यात्मिक बंध आहे. दोन्ही देश बौद्ध धर्माच्या सूत्राने जोडलेले असून, त्यामुळे आपल्याला ‘आध्यात्मिक भावंडं’ असेही संबोधले जाते.” पुढे मोदींनी मोठी घोषणा करत सांगितले कि, “मला आनंद आहे की पुढील वर्षी भगवान बुद्धांचे दोन महान शिष्य सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष भारतातून मंगोलियाला पाठवले जातील.”
पंतप्रधान म्हणाले, “लद्दाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषद आणि मंगोलियाच्या अरखांगई प्रांत यांच्यात स्वाक्षरी झालेला करार सांस्कृतिक संबंधांना नवे बळ देईल. भारत मंगोलियाच्या युवा सांस्कृतिक राजदूतांच्या भारतदौऱ्याचे प्रायोजन करणार आहे.” मोदी म्हणाले, “भारत मंगोलियाच्या विकासात एक दृढ आणि विश्वासार्ह भागीदार ठरला आहे. भारताच्या १.७ अब्ज डॉलर्सच्या सहाय्याने मंगोलियामध्ये उभारण्यात येणारा तेल शुद्धीकरण प्रकल्प त्यांच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्वाचा आहे. २,५०० हून अधिक भारतीय तज्ज्ञ या प्रकल्पावर मंगोलियन भागीदारांसोबत काम करत आहेत. ही भारताची जगातील सर्वात मोठी विकास भागीदार प्रकल्पांपैकी एक आहे.”
मोदी म्हणाले, “आम्ही कौशल्य विकास क्षेत्रात सहकार्य वाढवले आहे. अटल बिहारी वाजपेयी आयटी उत्कृष्टता केंद्र आणि भारत-मंगोलिया मैत्री विद्यालय यामार्फत मंगोलियन तरुणांचे स्वप्न पूर्ण होत आहे.या सर्व योजना आपल्या गाढ मैत्रीचे प्रतीक आहेत.” संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये मंगोलियाचे राष्ट्रपती खुरेलसुख उखना म्हणाले, “मंगोलियाची एक विमान कंपनी या वर्षाच्या शेवटी अमृतसर आणि नवी दिल्लीसाठी चार्टर फ्लाइट्स सुरू करण्याची तयारी करत आहे, ज्यामुळे पर्यटन आणि व्यापार क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत होईल.”