bank of maharashtra

संसद भवनाची सुरक्षा आणखी बळकट होणार

0

नवी दिल्ली : संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत केली जाणार आहे. परिसराच्या बाह्य परिघामध्ये विशेष प्रकाश व्यवस्था, विद्युत कुंपण (इलेक्ट्रिक पॉवर फेन्स), ऑप्टिकल फायबर नेटवर्क आणि अतिक्रमण ओळखणारी आधुनिक प्रणाली बसवण्यात येणार आहे. संसद भवन परिसरावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून २४ तास सतत नजर ठेवली जाणार आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने (सीपीडब्ल्यूडी) यासंदर्भात निविदा प्रसिद्ध केली आहे. संसद भवनाच्या या नव्या सुरक्षाव्यवस्थेमुळे संसद भवनाच्या चारही बाजूंनी उच्च दर्जाची प्रकाश व्यवस्था केली जाईल. तसंच, प्रवेश अडवण्यासाठी व अपघाती घुसखोरी रोखण्यासाठी विजेचा धक्का देणारे कुंपण बसवले जाणार आहे.

याशिवाय, ऑप्टिकल फायबर नेटवर्क व अत्याधुनिक अतिक्रमण शोध प्रणाली देखील लावली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे सतत परिसरावर नजर ठेवणार आहेत. सीपीडब्ल्यूडीच्या अधिकृत वेबसाइटवर या प्रकल्पासाठी टेंडर जारी करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे खर्च १४.६२ कोटी रुपये इतका असून, १८ सप्टेंबर रोजी निवीदा उघडण्यात येईल. या प्रकल्पामध्ये संयुक्त उपक्रमाला परवानगी नसल्याचे सीपीडब्ल्यूडीने स्पष्ट केले आहे. संसदेच्या सुरक्षेबाबत हा निर्णय अशा वेळी घेतला जात आहे, जेव्हा अलीकडील काही घटनांनी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. गेल्या महिन्यात एका व्यक्तीने संसद भवनाच्या भिंतीवरून उडी मारून आत घुसण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला वेळीच अडवण्यात आले.

त्यापूर्वी १३ डिसेंबर २०२३ रोजी, २ जणांनी लोकसभा सभागृहात सुरक्षा भेदून दर्शक गॅलरीतून उडी घेतली होती आणि रंगीत धूर असलेली कॅन फेकली होती. तसेच, आणखी दोन व्यक्तींनी संसद परिसराबाहेरही अशाच प्रकारची कृती केली होती.टेंडरच्या माहितीनुसार, पात्र एजन्सीज/कॉन्ट्रॅक्टर्सकडून संसद भवन परिसरात ही विशेष प्रकाश व्यवस्था, विद्युत कुंपण, ऑप्टिकल फायबर नेटवर्क, अतिक्रमण शोध प्रणाली आणि सीसीटीव्ही व्यवस्थेची कामे चार महिन्यांच्या आत पूर्ण करण्याची अपेक्षा आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech