मुळ ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यात जन्मलेला, हा पांडू कोळी आपल्या वडिलोपार्जित, पारंपरिक, मासेमारी व्यवसायाच्या निमित्ताने, एकदा मालवाहू गलबताने प्रवास करत असताना, भर समुद्रात, गलबत अचानक वादळात सापडत. पांडू आणि सोबतचे खलाशी वादळाशी झुंज देत असताना, या संकटातून वाचवण्यासाठी, तो नकळत मनोमन श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा धावा करतो. श्री स्वामी समर्थ कृपेने वादळ शमते आणि गलबत सुखरुप किनारी परतते.
गलबतावरचे सर्व खलाशी आपण वाचलो म्हणून आनंदाने आपापल्या घरी जातात. पण पांडू मात्र घरी न जाता परस्पर श्री स्वामी समर्थांना भेटायला अक्कलकोट स्थानी निघतात. श्री स्वामी समर्थ कृपेनेच आपण वाचलो या भावनेतून पांडू स्वतःला श्री स्वामीं चरणी लीन होऊन समर्पित करतो.
श्री स्वामी समर्थ, पांडूला त्याच्यावर आलेल्या वादळाची खूण सांगून, त्याला प्रेमाने जवळ घेतात व त्याच्यावर अनुग्रह करतात आणि त्याला भगवी वस्त्र देऊन “घ्या, हा आनंद घ्या आणि “आनंद भारती” व्हा, या नावाने संबोधुन “जाव, बेदरका किल्ला बनाव”. अशा सुचना करून, पांडू कोळीचा श्री आनंद भारती होतो.
श्री स्वामी समर्थांच्या आदेशानुसार श्री आनंद भारती हे नाव धारण केलेला पांडू सर्व संग परित्याग करून ठाणे, पश्चिम येथील, चेंदणी कोळीवाडा, येथे कुटी बांधून अज्ञ जनाला मार्गदर्शन करित श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचे मर्म सांगून, उपदेश करत आनंद देऊ लागले.
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी, शके १८२३ या दिवशी श्री आनंद भारती महाराजांनी आपला देह त्याग करून आपली अवतार समाप्ती केली. त्यांच्या समाधी साठी त्यांच्याच एका निस्सिम भक्ताने, नौपाडा येथील आपली स्वतःची शेतजमीनीची जागा दान म्हणून दिली. कालांतराने काही संधीसाधू लोकांनी या पवित्र स्थानाचे, स्वतःच्या फायद्यासाठी, बहुतांश समाधी स्थानाच्या जागेचा अपहार तर केलाच परंतु समाधी स्थानाच्या जगेचे व्यापारीकरण करून स्वामी स्थानाची जागा गिळंकृत केली. हे आपणा सर्व भाविकांच्या निदर्शनास आणून देताना अत्यंत दुःख आणि खेदही होतो.
श्री आनंद भारती महाराजांना माझी विनम्र प्रार्थना आहे की त्यांनींच या समाधी स्थानाची जागा गिळंकृत करणाऱ्यांना सुबुद्धी देवो आणि आमच्या अराध्यांंचे समाधी स्थान अपहरण आणि व्यापारीकरणाऱ्यांच्या पाशातून मुक्त करावे. श्री स्वामी समर्थ.

स्वामी भक्त महेश वासुदेव कोळी,
चेंदणी कोळीवाडा ठाणे
