लखनऊ : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी लखनऊ येथील ब्रह्मोस एरोस्पेस युनिटमध्ये तयार केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या मालाला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटले की, ऑपरेशन सिंदूर हा पाकिस्तानसाठी एक ट्रेलर होता. पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच ब्रह्मोसच्या कक्षेत आहे. आता शत्रू ब्रह्मोसपासून सुटू शकत नाही.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, आज उत्तर प्रदेशातील लोकांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. उत्तर प्रदेश आणि लखनौचा विकास पाहून आनंद होतो, परंतु आज जेव्हा या भूमीवर संरक्षण क्षेत्राशी संबंधित एवढी मोठी कामगिरी होत आहे. तेव्हा माझ्या मनात स्वाभाविकपणे आनंदासोबत अभिमानाची भावना निर्माण होते. लखनौ संरक्षण उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.संरक्षण मंत्री म्हणाले की, भारताकडे आपल्या स्वप्नांना आत्मविश्वासात रूपांतरित करण्याची शक्ती आहे. या आत्मविश्वासाने आम्हाला ऑपरेशन सिंदूरमध्ये बळ दिले. ते म्हणाले की, विजय ही आपली सवय बनली आहे आणि ही सवय आणखी मजबूत करायला हवी. ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राची शक्ती जगाने पाहिली. लखनौ युनिटमधून दरवर्षी सुमारे १०० क्षेपणास्त्र प्रणाली तयार केल्या जातील. ब्रह्मोस नौदल, लष्कर आणि हवाई दलाचा कणा बनला आहे.
राजनाथ सिंह म्हणाले की, लखनऊ हा त्यांच्यासाठी केवळ संसदीय मतदारसंघ नाही. तो त्यांच्या हृदयात राहतो. लखनऊ हे केवळ संस्कृतीचे शहरच नाही तर तंत्रज्ञानाचे शहर देखील बनले आहे. आता ते उद्योगाचे शहर बनले आहे. येथून उचललेल्या प्रत्येक पावलाने ब्रह्मोस तसेच लखनौची विश्वासार्हता वाढवली आहे. हा प्रकल्प भारताच्या वाढत्या आत्मविश्वासाचे आणि ताकदीचे प्रतीक आहे. ते म्हणाले की, पूर्वी उत्तर प्रदेश गुंडगिरीचे ठिकाण होते. उत्तर प्रदेश आता कोणत्याही आव्हानासाठी सज्ज आहे. अंतर्गत आणि बाह्य सर्व आव्हानांना तोंड देण्यास उत्तर प्रदेश सज्ज आहे.