मुंबई : मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख देणारे, प्रादेशिक नाट्यसंस्कृतीचे निष्ठावंत वाहक आणि ‘वस्त्रहरण’ या नाटकाचे लेखक जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावत होती. दहिसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार, दि. २९) दहिसर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
गंगाराम गवाणकर हे नाव ‘वस्त्रहरण’ या नाटकामुळे मराठी रंगभूमीवर अमर झाले. या नाटकाने केवळ प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणले नाहीत, तर मालवणी बोलीभाषेच्या अस्सल भावविश्वाला मुख्य प्रवाहात आणले. ग्रामीण माणसाचा विनोद, त्याची व्यथा आणि जगण्याची उमेद त्यांच्या लेखणीतून झळकली. त्यांनी ‘जगर’ (१९९८) या मराठी चित्रपटाची पटकथा लिहिली होती, तर ‘वात्रट मेळा’, ‘वन रूम किचन’, ‘दोघी’, ‘वर भेटू नका’ यांसारखी २० हून अधिक नाटके त्यांच्या नावावर आहेत. मात्र ‘वस्त्रहरण’ या एकाच नाटकाने मराठी रंगभूमीवर प्रादेशिक भाषेच्या नाटकांचा नवा अध्याय लिहून ठेवला. गवाणकर यांना ‘मानाची संघटना लेखनकारकीर्द सन्मान पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने मालवणी आणि मराठी रंगभूमीने एक दिग्गज सर्जक लेखक गमावला आहे.
