bank of maharashtra

खडकाळ जमिनीवर बहरली सेंद्रिय पद्धतीने कर्टूल्याची यशस्वी शेती

0

इगतपुरी : बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु…शेतकऱ्यांचा विकास करण्या प्रगत शेतीची कास धरू …ह्यातील प्रत्येक शब्द जिवंत ठेवण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील खडकवाडी येथे फक्त ५ वी शिकलेल्या भरत रामचंद्र कडू ह्या कष्टाळू युवा शेतकऱ्याने नावीन्यपूर्ण शेतीचा प्रयोग केला आहे. सातत्याने दोन वर्ष शेतीमध्ये जगावेगळे हटके पिके घेण्याचे प्रयोग फसले तरी हार न मानता वेगळे करण्याचा ध्यास सोडला त्यांनी नाही. म्हणूनच त्यांनी खडकवाडी सारख्या अतिदुर्गम वाडीमध्ये खडकाळ असणाऱ्या १५ गुंठे जमिनीवर सेंद्रिय पद्धतीने कर्टूले ह्या जंगली बहुगुणी पिकाची शेती यशस्वी करून दाखवली आहे. ३०० रुपये किलोप्रमाणे त्यांचे कर्टूले राज्याची राजधानी मुंबईपासून उप राजधानी नागपूर पर्यंत पोहोचले आहे.

इगतपुरीचे उप कृषी अधिकारी किशोर भरते, सहाय्यक कृषी अधिकारी शिवचरण कोकाटे, मोहिनी चावरा, प्रगतीशील शेतकरी भगीरथ भगत यांच्या मार्गदर्शनामुळे कर्टूले शेतीतून आर्थिक समृद्धी साधणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सौभाग्यवती अश्विनी भरत कडू यांचे पाठबळ, कुटुंबाला उन्नत करण्याची जिद्ध, शेतीचे हटके प्रयोग करण्याचा संकल्प ही त्रिसूत्री कर्टूल्याची यशस्वी शेती करण्याची गुरुकिल्ली आहे अशी भावना भरत कडू यांनी व्यक्त केली.

कर्टूले शेतीचा हा इगतपुरी तालुक्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग असून यामुळे अनेक होतकरू शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार असल्याची प्रतिक्रिया इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी व्यक्त केली. कर्टूले मानवी जीवनासाठी अत्यंत बहूगुणी असून यामुळेच पावसाळ्यात ह्या भाजीला वारेमाप मागणी असते अशी माहिती उप कृषी अधिकारी किशोर भरते यांनी दिली.

पारंपरिक शेती करून शेतकऱ्यांच्या जीवनमानात कमालीचे परिवर्तन झाल्याचे दिसत नाही. यासह खडकाळ माळरान जमिनीचा साधे गवत उगायला सुद्धा उपयोग नसतो. ह्या ओसाड पडलेल्या जमिनीवर शेतीचे विविध प्रयोग कसे करता येईल याबाबत खडकवाडीचे युवा शेतकरी भरत रामचंद्र कडू यांनी इगतपुरीचे उप कृषी अधिकारी किशोर भरते, सहाय्यक कृषी अधिकारी शिवचरण कोकाटे, मोहिनी चावरा, प्रगतीशील शेतकरी भगीरथ भगत यांचे मार्गदर्शन घेतले. गेली दोन वर्ष कोणतेही खत आणि रासायनिक औषधे न वापरता कर्टूले शेती करून पाहिली. पण त्यामध्ये अपयशाने पाठ सोडली नाही.

यापूर्वी झालेल्या सगळ्या चुका यावर्षी दुरुस्त करून भरत कडू यांनी एप्रिलमध्ये कर्टूल्याचे महागडे कंद खडकाळ जमिनीत लागवड केले. अपेक्षेनुसार हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आणि दर्जेदार चवीची जंगली कर्टूले शेती खऱ्या अर्थाने फुलली. तालुक्यातील चोखंदळ ग्राहकांना याबाबत माहिती झाल्यावर कर्टूले घेण्यासाठी स्वतःहून संपर्क साधला जातो. याच प्रकारे मुंबई ते नागपूर पर्यंत कर्टूल्याची मागणी वाढली. अश्विनी भरत कडू ह्या भरत कडू यांच्यासह संपूर्ण व्यवस्थापन करतात.

कर्टूले शेती नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार असून पुढीलवर्षी उर्वरित क्षेत्रावर कर्टूले शेती बहरवणार येणार आहे. हे कंदवर्गीय पीक लागवडीनंतर सात आठ वर्ष चालते. त्यामुळे भांडवली खर्चात मोठी बचत, लागवडीच्या त्रासातून मुक्तता, मजुरांच्या लहरी प्रवृत्तीला चाप असे अनेक फायदे मिळणार आहे. कृषी विभागाकडून वेळोवेळी आवश्यक ते सर्व सहाय्य देण्यासाठी उप कृषी अधिकारी किशोर भरते यांनी भरत कडू यांना आश्वस्त केले. २० एप्रिल ते १० जून पर्यंत हंगाम असतो. हलकी, भारी, काळी, डोंगराळ, मुरमाड, लाल अशा कुठल्याही प्रकारच्या जमिनीवर कर्टूले शेती करता येते.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech