नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संसदीय अधिवेशनादरम्यान दिलेल्या राजीनाम्यावरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी त्यांच्या अनुपस्थितीचा संबंध कार्यमंत्रणा समितीच्या (बीएसी ) दुसऱ्या बैठकीशी जोडला, तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी याला “वैयक्तिक निर्णय” म्हणाले. काँग्रेसचे खासदार कार्ति चिदंबरम यांनी हे “सोव्हिएत शैलीतील राजीनामा” असल्याचे म्हणाले आहे. तसेच अनेक नेत्यांनी या निर्णयामागील पार्श्वभूमीवर संशय व्यक्त केला आहे.
जयराम रमेश म्हणाले की, सोमवारी दुपारी १२:३० वाजता धनखड यांनी बीएसी बैठकीच्या पहिल्या टप्प्याचे अध्यक्षस्थान भूषवले होते, ज्यात जे. पी. नड्डा आणि किरेन रिजिजू देखील उपस्थित होते. ठरल्याप्रमाणे ही बैठक संध्याकाळी ४:३० वाजता पुन्हा होणार होती. मात्र संध्याकाळी बैठक भरवली असता, दोन्ही वरिष्ठ नेते कोणतीही पूर्वसूचना न देता अनुपस्थित राहिले. ही गोष्ट उपराष्ट्रपती धनखड यांना खटकली आणि काही तासांतच त्यांनी राजीनामा दिला, असे रमेश यांनी सांगितले. कार्ति चिदंबरम यांनी या राजीनाम्याला “सोव्हिएत शैली”चे वर्णन दिले, जिथे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अचानक पदावरून हटवले जात असे. त्यांनी असा संकेत दिला की या घडामोडीमागे आणखी काही महत्त्वाचे खुलासे लवकरच समोर येऊ शकतात.
अखिलेश यादव म्हणाले की, हा धनखड यांचा वैयक्तिक निर्णय असला तरी भाजप विविध क्लृप्त्या वापरून निवडणूक प्रक्रियेला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी निवडणूक आयोग आणि प्रशासनावरही सवाल उपस्थित केले. इमरान मसूद यांनी विचारले, “जेव्हा धनखड संसद भवनात संपूर्ण वेळ उपस्थित होते, तेव्हा अचानक त्यांनी असा निर्णय का घेतला?” कपिल सिब्बल यांनी धनखड यांच्याशी असलेल्या वैयक्तिक नात्याचा उल्लेख करत दुःख व्यक्त केले. त्यांनी धनखड यांना “देशभक्त व राष्ट्रवादी” म्हणत त्यांच्या आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केली. मल्लू रवी यांनी राजीनाम्यामागे राजकीय अस्वस्थता असल्याचा दावा करत सरकारने बिहार निवडणुकीपूर्वी स्वतःच्या माणसाला या पदावर बसवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.
शिवसेना (यूबीटी) नेते आनंद दुबे आणि सीपीआय खासदार पी. संधोष कुमार यांनीही राजीनाम्याला अनपेक्षित व चिंताजनक म्हणाले आहेत. काँग्रेसचे दानिश अली, सुखदेव भगत आणि इतर नेत्यांनी सरकारवर अप्रत्यक्ष टीका करत यामागे न्यायमूर्ती वर्मा आणि यादव यांच्याशी संबंधित मतभेद आणि भाजपमधील अंतर्गत संघर्ष असल्याचे सूचित केले. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी धनखड यांचा राजीनामा “दुर्दैवी” असल्याचे म्हटले. त्यांनी हेही नमूद केले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया न आल्यामुळे ही बाब अधिक चिंताजनक आहे.