bank of maharashtra

‘ऑपरेशन मुस्कान’ आणि ‘ऑपरेशन शोध’मुळे हजारो महिला – बालकांचा शोध घेण्यात यश – मुख्यमंत्री

0

मुंबई : राज्यातील बेपत्ता झालेल्या बालकांच्या, महिला व मुलींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध सुरू केले असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेपत्ता बालके, मुली आणि महिलांचा शोध घेण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य चित्रा वाघ, प्रज्ञा सातव यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.राज्यात महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर पावले उचलली असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यास तत्काळ गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. जर लहान मुले बेपत्ता झाली, तर अपहरणाचा गुन्हा नोंदवला जातो.

नागपूर शहरात एकूण ५८९७ बेपत्ता प्रकरणांपैकी ५२१० व्यक्तींचा शोध लागला असून हे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक आहे. हे प्रमाण ९६-९७% पर्यंतही पोहोचते. लहान मुलांसाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ राबवण्यात आले. या मोहिमेअंतर्गत ४१९३ मुला-मुलींचा शोध लागला. याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून अनेक राज्यांनीही ही योजना स्वीकारली आहे. महिलांसाठी स्वतंत्र ‘ऑपरेशन शोध’ राबवण्यात आले. एका महिन्यात ४९६० हरवलेल्या महिला आणि १३६४ बालकांचा शोध लावण्यात आला. याशिवाय, १०६ महिला व ७०३ बालके अशी सापडली की ज्यांची कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती, मात्र ते बेपत्ता होते, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘मिसिंग सेल’ स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सेलमध्ये महिला पोलीस अधिकारी प्रमुख असतील. महिलांच्या सुरक्षेसाठी ‘एडीजे’ दर्जाच्या आयपीएस अधिकारी नेमण्यात आल्या आहे. काही महिला-मुली मानवी तस्करीच्या विळख्यात अडकतात. त्यामुळे सरकारने यासंदर्भात ठोस उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच “भरोसा” हे वन स्टॉप केंद्र महिलांना समुपदेशन, संरक्षण व कायदेशीर मदत पुरवते. घरगुती हिंसाचार, कौटुंबिक वाद यामुळे घर सोडलेल्या महिलांना या केंद्राचा उपयोग होतो. शालेय स्तरावर ‘पोलीस काका-दीदी’ उपक्रमांतर्गत लैंगिक शिक्षण, चांगला/वाईट स्पर्श यावर जनजागृती केली जाते. आता यामध्ये ‘मिसिंग पर्सन’ बाबतची माहितीही समाविष्ट केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech