bank of maharashtra

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडप परवानगीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू

0

अनिल गलगली यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई :  महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषित केल्यानंतर, मुंबई महानगरपालिकेने देखील श्रीगणेशोत्सवाच्या तयारीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या मागणीनंतर सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाईन मंडप परवानगी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनिल गलगली यांनी ४ जुलै २०२५ रोजी पालिकेचे उप आयुक्त प्रशांत सपकाळे यांना पत्राद्वारे विनंती केली होती की, श्रीगणेश मंडळांसाठी एक खिडकी योजना अंतर्गत संगणकीय प्रणाली सुरू करावी. मंडळांना वेळेत परवानग्या मिळाव्यात व गणेशोत्सवाच्या तयारीला वेळेत सुरुवात करता यावी, यासाठी ही मागणी करण्यात आली होती.

उप आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी या मागणीची तत्काळ दखल घेत, संगणकीय प्रणाली कार्यान्वित करत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे शहर व उपनगरांतील गणेश मंडळांना मंडप उभारणी, मूर्ती स्थापना, सजावट इत्यादीसाठी लागणाऱ्या परवानग्या मिळविणे अधिक सुलभ व पारदर्शक झाले आहे. अनिल गलगली यांनी सांगितले की, “मुंबईत हजारो सार्वजनिक गणेश मंडळे दरवर्षी उत्सव साजरा करतात. परंतु परवानगी प्रक्रियेमुळे अनेक अडचणी निर्माण होतात. ऑनलाईन प्रणालीमुळे ही प्रक्रिया सुसूत्र होईल व गणेशोत्सवाचे नियोजन वेळेत करता येईल.” शासन व महापालिकेच्या या संयुक्त निर्णयामुळे, यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव अधिक सुरळीत, नियोजित व सुरक्षित पद्धतीने पार पडेल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech