bank of maharashtra

बांगलादेशने आयात बंदी हटवल्यानंतर कांद्याच्या दरात अल्पशी सुधारणा

0

लासलगाव : बांगलादेश सरकारने कांद्याच्या आयातीवरील बंदी हटवल्यानंतर आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात अत्यंत अल्पशी सुधारणा झाली आहे.मात्र ही दर वाढ शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. बांगलादेशने काही विशिष्ट प्रमाणातच कांद्याच्या आयातीस परवानगी दिल्याचे सांगितले जात आहे तसेच तेथील शेतकरी व व्यापाऱ्यांनी साठविलेला कांदा काही प्रमाणात शिल्लक आहे.तो संपल्यानंतर भारतीय कांद्याच्या निर्यातीला गती येण्याची आशा निर्यातदार बाळगून आहेत. सध्या जरी २०० टन कांदा पाठवण्याची परवानगी मिळाली असली तरी,येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होण्याची शक्यता आहे.

जाणकारांच्या मते, जोपर्यंत केंद्र सरकार भारतीय निर्यातदारांना प्रोत्साहन देत नाही,तोपर्यंत कांद्याच्या दरात मोठी सुधारणा होणे कठीण आहे. लासलगाव बाजार समितीत मंगळवारी १७ हजार ५०० क्विंटल कांद्याची बम्पर आवक झाली.कांद्याला कमीत कमी ७००/- रुपये,जास्तीत जास्त १८०१/- रुपये तर सरासरी १६४०/- रुपये प्रतीक्विंटल बाजार भाव मिळाला तर गेल्या आठवड्यात शनिवारी ८ हजार ६२४ क्विंटल कांद्याची आवक झाली होती.बाजार भाव कमीत कमी ६००/- रुपये, जास्तीत जास्त १७२५/- रुपये तर सरासरी १५७५/- रुपये प्रति क्विंटल भाव मिळाले होते,म्हणजे सरासरी दरात फक्त ६५ रुपये प्रति क्विंटल अशी अल्पशी वाढ झाली आहे.

बांगलादेश हा भारतीय कांद्याचा सर्वात मोठा खरेदीदार आहे.भारत दरवर्षी जेवढा एकूण कांदा निर्यात करतो, त्यातील २० टक्के कांदा एकट्या बांगलादेशमध्ये जातो या वर्षी बांगलादेशमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे त्यामुळे फेब्रुवारीपासून निर्यातीत अडचणी आल्या होत्या.नंतर कांद्याची आयात त्यांच्याकडून थांबविली गेली.आता कांदा संपुष्टात येऊ लागल्याने बांंगलादेशने आयातीला परवानगी दिली असली तरी निर्यात वेग पकडण्यास १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार आहे. यासंदर्भात लासलगावातील कांदा निर्यातदार अफजल शेख म्हणाले की,

बांगलादेश ने कांद्याची आयात बंदी हटवल्यानंतर लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात अल्पशी वाढ झाली आहे तसेच बांगलादेशने काही विशिष्ट प्रमाणातच आयातीस परवानगी दिली आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे जोपर्यंत केंद्र सरकार भारतीय निर्यातदारांना प्रोत्साहन देत नाही,तोपर्यंत कांद्याच्या दरात मोठी सुधारणा होणे कठीण असल्याचे शेख यांनी सांगितले. तर कांदा उत्पादक संतोष पानगव्हाणे म्हणाले की,

सध्या कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावातून कांदा उत्पादन करण्यासाठी झालेला खर्चही फिटत नाही परिणामी कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहे.यंदा महाराष्ट्रासह इतर कांदा उत्पादक राज्यात कांद्याचे भरघोस उत्पादन झालेले आहे त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीस प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून भारतीय कांद्याची निर्यात वाढेल व शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे अधिकचे पडतील असे त्यांनी सांगितले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech