लासलगाव : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले नुकसान,साठवणुकीतील कांदा सडणे आणि बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे.काही ठिकाणी तर उत्पादन खर्चही निघणेही कठीण झाले आहे.ऐन सणासुदीच्या काळात आलेल्या या आर्थिक संकटामुळे दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक कुटुंबांना पडला आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत गुरुवारी उन्हाळ कांद्याची अंदाजे १२००० क्विंटल आवक झाली व त्या कांद्याला कमीत कमी ४००/- जास्तीत जास्त १४००/- तर सरासरी १०७५/- रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव मिळाला,मात्र उत्पादन खर्च प्रति किलो १० ते १५ रुपये होत असल्यामुळे कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे तसेच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तर काही शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा सडत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दि १७ ऑक्टोबर पासून पुढील सात दिवस दिवाळीनिमित्त लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव होणार नसल्याने व सणासुदीला हातात दोन पैसे राहावेत,यासाठी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणल्याने पर्यायाने आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सध्या कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावातून उत्पादनासाठी झालेला उत्पादन खर्च देखिल वसूल होत नाही. कांद्याच्या दरात वाढ होईल या आशेने शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा साठवणूक करून ठेवला आहे.मात्र हा कांदा देखील आता बदलत्या वातावरणामुळे सडत आहे.या संकटामुळे दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक कुटुंबांना पडला आहे.सचिन होळकर,कृषी तज्ञ लासलगाव कोणतीही वस्तू उत्पादन करतांना त्याचा भाव ठरविण्याचा अधिकार कारखानदार,व्यापारी यांना आहे तर मग अथक कष्ट करून पिकविलेल्या कांद्यासह इतर शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार आम्हाला का नाही ? कांद्याला किमान प्रती क्विंटल २२०० ते २५०० रुपये मिळेल अशी व्यवस्था सरकारने करावी.