नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) गुणवत्ता आणि एकात्मतेमध्ये रुजलेला राष्ट्र उभारणीचा आधारस्तंभ असे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संबोधले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहोळ्याच्या उद्घाटन प्रसंगी नवी दिल्ली येथे उपस्थितांना संबोधित करताना लोकसभा सभापतींनी आयोगाच्या १०० वर्षांच्या वाटचालीला भारताच्या लोकशाहीवादी आणि प्रशासकीय उत्क्रांतीमधील एक निर्णायक अध्याय असे नाव दिले.
यावेळी केलेल्या बीज भाषणात बिर्ला म्हणाले की गुणवत्ता, पारदर्शकता आणि नैतिक मूल्यांमध्ये रुजलेल्या या संस्थेने लाखो तरुण भारतीयांना सरकारी सेवेप्रती समर्पित होण्याची प्रेरणा दिली आहे. वर्ष २०४७ पर्यंत विकसित आणि समावेशक राष्ट्र होण्याच्या दिशेने भारताची घोडदौड सुरु असताना, यूपीएससीची ही भूमिका आणखी महत्त्वाची ठरते हे त्यांनी अधोरेखित केले. डिजिटल युग, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि वेगाने बदलत असलेल्या जागतिक परिदृश्याच्या पार्शवभूमीवर युपीएससीने त्यांच्या प्रक्रियांमध्ये सुधारणा केली आहे आणि त्यांच्या निवड प्रक्रियेला अधिक प्रगत, शास्त्रीय आणि पारदर्शक स्वरूप देऊन, उत्तम प्रशासनासाठी नवे मापदंड स्थापित केले आहेत असे निरीक्षण बिर्ला यांनी नोंदवले.
हे शताब्दी वर्ष आयोगाला नवी उर्जा, दिशा तसेच आगामी दशकांसाठीचा निर्धार देईल आणि राष्ट्र-उभारणीसाठी प्रभावी दल बनण्यासाठी या पिढीला तयार होण्यात मदत करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की ही संस्था यापुढे देखील विकसित, नवोन्मेषी तसेच जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या भारताच्या उभारणीचा निर्धार वास्तवात साकार करत सरकारी सेवकांच्या अशा पिढ्या घडवणे सुरूच ठेवेल जे केवळ सरकारी अधिकारी नाहीत तर राष्ट्रउभारणीसाठी शक्तिशाली घटक म्हणून देखील कार्य करतील.
या प्रसंगी, यूपीएससीचे आजी आणि माजी अध्यक्ष, सदस्य, अधिकारी,तसेच यूपीएससीशी संबंधित असलेले सर्व कर्मचारी यांचे अभिनंदन करून बिर्ला यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ.अजय कुमार यांनी स्वागतपर भाषण केले.
