नवी दिल्ली : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भाजपाला नवा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मिळाला आहे. बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांचा आज, सोमवारी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पदग्रहण सोहळा पार पडला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्यांना पदभार स्वीकारण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तसेच बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांचा दिल्लीतील भाजप मुख्यालयात सन्मानपूर्वक पदग्रहण सोहळा झाला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नितीन नबीन यांना पटका घालून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यानंतर पक्ष कार्यालयात उपस्थित असलेल्या अनेक भाजप नेत्यांनी नितीन नबीन यांना पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे नितीन नबीन यांचा जन्म २३ मे १९८० रोजी झाला आहे. कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांचे वय ४५ वर्षे असून, भाजपाची स्थापना होऊनही तेवढीच वर्षे पूर्ण झाली आहेत.
यापूर्वी, दिल्लीमध्ये कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच पक्ष मुख्यालयात दाखल होताच नितीन नबीन यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दिल्ली भाजपाचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले होते. बिहारमध्ये नितीन नबीन यांची प्रतिमा स्वच्छ, प्रामाणिक आणि संघटनेवर मजबूत पकड असलेल्या नेत्याची आहे. नितीन नबीन हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि जे. पी. आंदोलनातून राजकारणात प्रवेश केलेले दिवंगत नबीन सिन्हा यांचे पुत्र आहेत. नितीन नबीन यांचा जन्म २३ मे १९८० रोजी पाटणा येथे झाला. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण दिल्लीमध्ये झाले. २००५ मध्ये पाटणा पश्चिम मतदारसंघाचे आमदार असलेले नबीन सिन्हा (वय ५५) यांचे दिल्लीमध्ये निधन झाले. त्या वेळी नितीन नबीन केवळ २६ वर्षांचे होते. भाजपाने आतापर्यंतचा सर्वात तरुण कार्यकारी अध्यक्ष निवडला आहे. जर ते भविष्यात राष्ट्रीय अध्यक्ष झाले, तर भाजपाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला जाईल. सध्या हा विक्रम अमित शाह यांच्या नावावर असून, ते ४९ वर्षांच्या वयात अध्यक्ष झाले होते. तर नितीन गडकरी ५२ वर्षांचे असताना राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. तसेच ७६ वर्षांच्या वयात लालकृष्ण आडवाणी हे भाजपाचे सर्वाधिक वयाचे अध्यक्ष ठरले होते.
