ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर वाहने, शहरातील रस्ते स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी आधुनिक रोड स्वीपर मशिन्स, तसेच उद्यान विभागामध्ये धोकादायक वृक्षाच्या फांद्या छाटण्यासाठी हायड्रॉलिक एरियल लिफ्ट ही वाहने ठाणे महापालिकेत उपलब्ध करुण्यात आली आहे. या सर्व वाहनांचे लोकार्पण आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या शुभहस्ते व सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीत ठाणे महापालिका भवन येथे करण्यात आले. या नव्या वाहनांमुळे ठाणे शहरातील आपत्कालीन सेवा, रस्त्यांची स्वच्छता व पावसाळ्यापूर्वी फांद्या छाटणी ही कामे अधिक जलदगतीने होण्यास मदत होणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ ऊ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त दिनेश तायडे, मधुकर बोडके, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह नगरसेवक अनिल भोर, दिलीप बारटक्के, राजेश मोरे, प्रशांत जाधवर, नगरसेविका प्रमिला केणी, विमल भोईर, एकता भोईर, नम्रता भोसले-जाधव, डॉ. दर्शना जानकर, माजी नगरसेवक एकनाथ भोईर उपस्थित होते.
ठाणे अग्निशमन विभागाची एकूण १२ अग्निशमन केंद्रे २४x७ कार्यरत असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित सेवा देण्याचे काम सातत्याने केले जात आहे. ही यंत्रणा अधिक सक्षम व्हावी यासाठी अद्ययावत आणि सुसज्ज फायर वाहने ताफ्यात समाविष्ट करण्यात आली असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले. ही वाहने पूर्णपणे स्वयंचलित स्वरूपाची आहेत. प्रत्येक वाहनामध्ये ४००० लिटर पाण्याची क्षमता आहे तसेच, प्रथमच मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर वाहनेही ठाणे अग्निशमन दलात दाखल झाली असून 35 मीटर उंचीपर्यत पोहचून आग विझवण्याची क्षमता या वाहनांची आहे.
ठाणे महानगरपालिका शहरातील रस्ते साफसफाई आधुनिक पध्दतीने करणेसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत एकूण चार मॅकेनिकल रोड स्वीपर मशीन मुख्य रस्त्यांच्या साफसफाईसाठी वापरण्यात येणार आहेत. या उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे रस्त्यांची स्वच्छता राखून आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे, हाताने स्वच्छतेवरील अवलंबित्व कमी करणे, धूळमुक्त परिसर करणे व स्वच्छता अधिक अत्याधुनिक पध्दतीने करण्यास मदत होणार असल्याचे महापौरांनी नमूद केले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक वृक्षाच्या फांद्या छाटण्याकरिता हायड्रॉलिक एरियल लिफ्टची ५ वाहने दाखल झाली आहेत. बोलेरो पिकअप वाहनावर बसवलेली हायड्रॉलिक एरियल लिफ्ट बसविण्यात आली असून दुहेरी स्विंग आर्म यंत्रणा असलेली १० मीटर कार्यरत उंचीची हायड्रॉलिक एरियल लिफ्ट आहे. ही लिफ्ट साध्या शिडीपेक्षा अधिक सुरक्षित असून या माध्यमातून धोकादायक अति उंच वृक्षांच्या फांद्या छाटणीचे काम जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.
