नवी दिल्ली : नेपाळमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गोंधळ आणि हिंसाचार सुरू आहे. या पार्श्ववभूमीवर नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली, राष्ट्रपती आणि अनेक मंत्र्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. सध्या नेपाळची सूत्रं लष्कराच्या हातात आहेत.या संपूर्ण घडामोडींवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळच्या जनतेला शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून ट्विट करत सांगितले, “आज हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या दौर्यावरून परत आल्यानंतर सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत नेपाळमधील परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. नेपाळमध्ये घडलेली हिंसा हृदय विदारक आहे. अनेक तरुणांचे प्राण गेले हे ऐकून फार दु:ख झाले. नेपाळची स्थिरता, शांतता आणि समृद्धी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मी नेपाळमधील सर्व बंधूं-भगिनींना नम्र आवाहन करतो की त्यांनी शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवावी.”
पंतप्रधान मोदींनी मंगळवारी(दि.९) नेपाळमधील स्थितीवर चर्चा करण्यासाठी सीसीएस बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीत पंतप्रधान मोदींबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृह मंत्री अमित शाह, वित्त मंत्री निर्मला सीतारमण आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेही उपस्थित होते.या बैठकीत पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे सांगितले की नेपाळची स्थिरता, शांतता आणि समृद्धी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी हीही टिप्पणी केली की नेपाळमध्ये घडलेली हिंसा हृदयविदारक आहे. जेन-झेड आंदोलनामुळे गेल्या दोन दिवसांपासून नेपाळ अशांत आहे, आणि आता तिथे लष्कराची तैनाती करण्यात आलेली आहे. रात्री १० वाजल्यानंतर काठमांडूच्या रस्त्यांवर लष्कराच्या हालचाली सुरू झाल्या. नेपाळ आर्मीच्या बख्तरबंद गाड्या रात्रीभर काठमांडूच्या रस्त्यांवर गस्त घालत होत्या. याच दरम्यान लष्कराने अनेक उपद्रव करणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले आहे. एकंदरीत पाहता, आता नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी लष्करावर सोपवण्यात आली आहे.