गडचिरोली : नक्षल चळवळीतील वरिष्ठ पोलित ब्युरो सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती (सोनू दादा) याने आपल्या सुमारे ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलीस समोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. भूपती हा देशातील ‘मोस्ट वॉन्टेड’ नक्षलवादी म्होरक्यांपैकी एक असून त्याच्यावर विविध राज्यांनी मिळून सुमारे १० कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याचे नाव केंद्रीय समिती आणि पोलित ब्युरो या नक्षल संघटनेच्या सर्वोच्च स्तरांवर आहे.
अलीकडे भूपतीने आपल्या नावाने एक पत्रक प्रसिद्ध केले होते. या पत्रकात त्याने म्हटले होते की “शस्त्र उचलणे ही एक चूक होती” आणि “जनतेची माफी मागून शांततेचा मार्ग स्वीकारणे गरजेचे आहे.” या वक्तव्यामुळे नक्षल संघटनेत अंतर्गत फूट निर्माण झाली होती. केंद्रीय समितीतील काही सदस्यांनी या वक्तव्याला “विश्वासघातकी भूमिका” असे संबोधले होते. भूपती मागील २ दशकांपासून छत्तीसगड–महाराष्ट्र सीमावर्ती भागात सक्रिय होता. तो नक्षल चळवळीचा रणनीतिकार म्हणून ओळखला जात होता आणि बसवराजू उर्फ नंबाला केशव राव यांच्या निधनानंतर पुढील महासचिव पदासाठी त्याचे नाव चर्चेत होते.गडचिरोली पोलिसांनी या घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप दिलेली नसली तरी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की काही “उच्च पातळीवरील चर्चा आणि आत्मसमर्पण प्रक्रियेची तयारी” सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहिनुसार भूपतीने १३ ऑक्टोबरच्या रात्रीच आत्मसमर्पण केले आहे. परंतु, गुरुवारी १६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूपती आणि त्याचे अनुयायी शस्त्रत्याग करून औपचारिक शरणागती पत्करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आत्मसमर्पणासंदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नक्षल संघटनेच्या विद्यमान नेतृत्वाने भूपतीच्या पावलावर कठोर नाराजी व्यक्त केली आहे. काही भागांमध्ये भूपतीविरोधी पत्रके काढण्यात आली असून, त्याला “संघटन सोडून सरकारशी हातमिळवणी करणारा” असा आरोप करण्यात आला आहे.