मुंबई : मुंबईतील बहुप्रतिक्षित मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामुळे दक्षिण मुंबईतील कफ परेड ते पश्चिम उपनगरातील आरे जेवीएलआरपर्यंत पूर्णपणे मेट्रो कार्यरत झाली. मात्र आता मेट्रो लाईन ३ च्या विज्ञान केंद्र या वरळीजवळील स्टेशनच्या नावावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपने जाणीवपूर्वक या स्टेशनला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव दिले नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोशल मीडियावर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नेहरूजींचे योगदान इतके मोठे आहे की, भाजपने त्यांच्याबद्दल कितीही द्वेष केला किंवा त्यांचा वारसा खराब करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे हे प्रयत्न आकाशात थुंकण्यासारखे व्यर्थ ठरतील, असा घणाघात सचिन सावंत यांनी केला.
यामुळे माजी पंतप्रधान आणि जागतिक व्यक्तिमत्त्व असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीचा भाजपकडून अपमान करण्यात आला आहे, असा आरोप सावंत यांनी केला आहे. नेहरूंच्या दूरदृष्टीमुळेच भारताच्या वैज्ञानिक दृष्टिकोन, औद्योगिक प्रगती आणि आधुनिक दृष्टिकोनाची पायाभरणी झाली. मात्र भाजपचे हे कृत्य त्यांची संकुचित विचारसरणी, असहिष्णु आणि सूडाची मानसिकता दर्शवते असे सचिन सावंत यांनी म्हटले. मेट्रो लाईन ३ चे वरळी हे मेट्रो स्टेशन ज्या परिसरात आहे, तो परिसर नेहरु सायन्स सेंटर या नावाने ओळखला जातो. हे संपूर्ण देशाला माहिती आहे. पण भाजपला नेहरूंच्या नावाशी ॲलर्जी आहे. भाजपने जाणीवपूर्वक स्टेशनचे नाव फक्त सायन्स सेंटर ठेवले आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केला.
यापूर्वी दिल्लीतील ‘नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी’चे नाव बदलून ‘प्राइम मिनिस्टर्स म्युझियम’ करण्यात आले. तसेच नेहरू युवा केंद्र संघटना (NYKS) चे नाव माय भारतने बदलण्यात आले होते. भारताच्या महान नेत्यांशी आणि राष्ट्रसंस्थापकांशी कसे वागले जात आहे, हे जग पाहत आहे. भाजपची विकृत मानसिकता केवळ इतिहास पुसत नाहीये, तर आपल्या राष्ट्राची प्रतिष्ठा आणि जागतिक प्रतिमाही डागाळत आहे. आम्ही या लज्जास्पद कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो, असे सचिन सावंत म्हणाले.