नवी दिल्ली : “मुंबई ही महाराष्ट्राची नव्हे, तर गुजरातचा भाग होता,” असे विधान भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केले आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी मुंबईतील मराठी भाषिकांचे प्रमाण अवघे ३१-३२ टक्केच असल्याचा दावा करत, हिंदी भाषिकांवर होणाऱ्या कथित अन्यायावर संताप व्यक्त केला. दुबे म्हणाले, “१९५६ मध्ये भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मुंबई महाराष्ट्रात आली. पण आजही मुंबईत फक्त ३२% लोक मराठी भाषिक आहेत, तितकेच हिंदी भाषिक आहेत. उर्वरितांमध्ये भोजपुरी, गुजराती, तेलगु, तामिळ, राजस्थानी, उर्दू भाषिकांचा वाटा मोठा आहे. अशा महानगरात अमराठी लोकांवर टीका होणे हे दुर्दैवी आहे.”
यावेळी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना दुबे म्हणाले, “देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे हे मान्य. पण एसबीआय, एलआयसी, रिलायन्स, टाटा, बिर्ला, जिंदाल यांचे मुख्यालय मुंबईत असल्याने त्यांचा करही महाराष्ट्रात जमा होतो. त्यामुळे आम्हीही त्या करात हिस्सेदार आहोत.” ते पुढे म्हणाले, “जर अमराठी माणसे नको असतील तर स्टेट बँक ऑफ इंडिया, एलआयसी, बीएसई, एनएसई, सेबी यांचे मुख्यालय काढा. या संस्थांचे प्रमुख मराठी नाहीत. त्यांना हाकलून द्या, ते करदाते आहेत, ते अमराठी आहेत.”
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमराठी लोकांवर हल्ले वाढतात असा आरोप करत दुबे म्हणाले, “माझी मातृभाषा हिंदी आहे. हिंदीवर कुठेही हल्ला झाला तर मी आवाज उठवणारच. राज ठाकरे, उद्धव ठाकरे लॉर्ड्स साहेब नाहीत. मी खासदार आहे, कायदा हातात घेत नाही. पण जर हे बाहेर गेले तर जनता त्यांना आपटून आपटून मारेल,” असा संतप्त इशारा त्यांनी दिला आहे.