bank of maharashtra

‘मुंबई वन’ ॲपमुळे प्रवास होणार सुलभ

0

मुंबई : मुंबई महानगरातील प्रवाशांचा वेगवेगळ्या वाहतूक सेवांसाठी वेगवेगळी तिकिटे काढण्याचा त्रास आता इतिहासजमा होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मुंबई वन’ हे देशातील पहिले कॉमन मोबिलिटी ॲप तयार केले असून, या ॲपचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या नव्या ॲपमुळे प्रवाशांना एकाच क्यूआर कोडद्वारे मेट्रो, बस, मोनोरेल आणि उपनगरी रेल्वे अशा ११ सार्वजनिक परिवहन सेवांचा वापर करता येणार आहे. हे ॲप ९ ऑक्टोबरपासून पहाटे ५ वाजल्यापासून प्रवाशांसाठी उपलब्ध झाले आहे.

एमएमआरडीएने प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि अखंड करण्याच्या उद्देशाने ‘मुंबई वन’ ॲप विकसित केले आहे. “ॲप-अमर्याद प्रवास” या घोषवाक्याखाली सादर झालेल्या या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे ते हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांना भाषेची कोणतीही अडचण येणार नाही. हे ॲप दररोज १ ते १.५ लाख व्यवहार सुरळीत हाताळू शकेल, तर सर्व्हर दररोज ५० लाख व्यवहार हाताळण्यास सक्षम असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘मुंबई वन’ ॲपमुळे प्रवाशांना प्रवासासाठी वेगवेगळी तिकिटे घेण्याच्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे. प्रत्येक प्रवासासाठी वेगळे बुकिंग करण्याची गरज नाही, तसेच तिकीट मिळवण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता उरणार नाही. हे ॲप कागदी तिकिटांचा वापर कमी करून पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘शेअर माय लोकेशन’ आणि आपत्कालीन हेल्पलाइनसारख्या फीचर्स ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान सुरक्षिततेची खात्री मिळणार आहे.

या ॲपद्वारे घाटकोपर-वर्सोवा मेट्रो १, अंधेरी-दहिसर मेट्रो २अ आणि मेट्रो ७, कफ परेड-आरे मेट्रो ३, नवी मुंबई मेट्रो, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे, बेस्ट, टीएमटी, एमबीएमटी, केडीएमटी आणि एनएमएमटी या सर्व वाहतूक सेवांचे तिकीट एका ठिकाणावरून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये अखंड समन्वय निर्माण होणार असून, प्रवाशांचा वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत.

‘मुंबई वन’ ॲपमुळे प्रवाशांना त्यांच्या मार्गांची उपलब्धता आणि सेवा संदर्भातील रिअल-टाइम माहिती मिळेल. सर्व व्यवहार डिजिटल वॉलेट्स किंवा प्रीपेड बॅलन्सद्वारे पूर्णतः कॅशलेस पद्धतीने होतील आणि ॲप वापरण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे हे ॲप सामान्य प्रवाशांसाठी किफायतशीर आणि सुलभ ठरणार आहे.

याशिवाय, या ॲपमुळे मुंबईतील पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. देशी आणि परदेशी पर्यटकांना शहरातील प्रमुख आकर्षणे, खाद्यसंस्कृती, सांस्कृतिक केंद्रे आणि प्रेक्षणीय स्थळांची सविस्तर माहिती या ॲपवर मिळणार आहे. मॉल, पेट्रोल पंप आणि इतर उपयुक्त स्थळांचे नकाशावर आधारित तपशीलदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवाशांना आणि पर्यटकांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन अधिक सुलभतेने करता येईल.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech