मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणामुळे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आझाद मैदानावर पाच दिवसांपासून उपोषण सुरू असताना मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते दक्षिण मुंबईत दाखल झाले. आंदोलनामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली, चाकरमान्यांना हाल सोसावे लागले आणि सार्वजनिक जीवन ठप्प होऊ लागले. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दुपारपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने स्पष्ट निर्देश देत आंदोलकांना आझाद मैदानापुरतेच मर्यादित ठेवण्यास सांगितले. सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणांवरून आंदोलकांना हटवण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई पोलिस कारवाई करत आहेत.
न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या गाड्या हटवण्यास सुरुवात केली. वाडी बंदर, ऑरेंज गेट, भाऊचा धक्का, पूर्व मुक्त मार्ग आणि बीपीटी रोड परिसर मोकळा करण्यात आला. पोलिसांनी लाऊडस्पीकरद्वारे आवाहन करत आंदोलकांना कोर्टाच्या निर्णयाचे पालन करण्याचे आवाहन केले. अनेक ठिकाणी आंदोलकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला, तर काही ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाला. आंदोलकांना सीएसएमटी स्थानकातून बाहेर काढण्यात आले आणि गाड्या हळूहळू मुंबईच्या बाहेर हलवण्यात आल्या आहेत.
मनोज जरांगे यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना कोर्टाच्या आदेशाचे पालन करून रस्ते मोकळे करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या निर्देशाचा दाखला देत अनेक आंदोलकांनी आपली गाडी हटवण्यास तयारी दाखवली. तरीही काही आंदोलकांनी आंदोलन मोडून काढण्याचा हा डाव असल्याचा आरोप केला आणि पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. त्यांना वाशी, नेरूळ, सानपाडा आणि सीबीडी बेलापूर परिसरातील मोकळ्या मैदानात गाड्या पार्क करण्यास सांगितले आहे. मराठा समन्वय समिती आणि पोलीस मिळून मुंबईतून येणाऱ्या गाड्यांच्या पार्किंगवर देखरेख ठेवत आहेत.
मुंबई हळूहळू रिकामी होत असताना मंत्रालय परिसरातील परिस्थिती देखील पूर्वपदावर येऊ लागली. काल आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत मंत्रालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज काही रस्ते पुन्हा वाहतुकीसाठी खुले करण्यात आले असून मंत्रालय परिसरात सतत पोलीस तैनात आहेत. वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू आहे. मुंबई पोर्टमध्ये जाणारी मालवाहतूक, बीपीएचपी कंपनीत जाणारी टँकर वाहतूक आणि खासगी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. आंदोलकांनी मात्र आम्हाला कुठेही थांबू दिले जात नाही, अशा तक्रारी करत नाराजी व्यक्त केली.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संयमाने कारवाई केली. आंदोलकांना सतत आवाहन करत “तुम्ही सहकार्य करा, आम्हीही सहकार्य करू” अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. हळूहळू रस्ते मोकळे होत असून दक्षिण मुंबई पूर्ववत होण्याच्या दिशेने जात आहे.