bank of maharashtra

‘इंडिया मेरीटाईम वीकसाठी केंद्राने मुंबईत कायमचे केंद्र उभारावे – मुख्यमंत्री

0

मुंबई : भारतीय सागरी क्षेत्राच्या विकासासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘इंडिया मेरीटाइम वीक २०२५’ या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारने मुंबई येथे कायमचे केंद्र उभारावे. महाराष्ट्र या केंद्राचा जागतिक स्तरावर विकास करण्याबरोबर इंडिया मेरीटाईम वीक ही थीम जागतिक स्तरावर निर्माण करेल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केला. मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ च्या आयोजनाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीस केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, उपमुख्यमंत्री अजित पवार, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान नेस्को एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे इंडिया मेरीटाईम वीक २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. तर केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

मुंबईमध्ये आर्थिक विकासाच्या मोठ्या संधी असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या विकासात महाराष्ट्राचा वाटा नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे. इंडिया मेरीटाईम वीक २०२५ च्या निमित्ताने देशासह राज्याच्या सागरी विकासात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. सागरी गुंतवणुकीसाठी राज्यात पोषक वातावरण असून या ‘मेरीटाईम वीक’ मुळे त्यास आणखी चालना मिळेल. जागतिक सागरी क्षेत्रामध्ये देश आणि महाराष्ट्र एक नवी ओळख निर्माण करत आहे. जहाजबांधणी धोरणामुळे राज्यात या क्षेत्रात नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशाच्या सागरी क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्र नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल. महाराष्ट्र सागरी क्षेत्रात एक नवा अध्याय लिहित आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॅरिटीने क्षमतावाढ केली आहे. तर नवीन वाढवण बंदरामुळे विकासाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ च्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानतो. महाराष्ट्र शासन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सहकार्य करेल. हा कार्यक्रम भव्य आणि जागतिक दर्जाचा होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले की, ‘मेरीटाइम वीक’ सारख्या कार्यक्रमांसाठी मुंबई हे योग्य ठिकाण आहे. महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी आहेत. त्याचा लाभ देशातील उद्योगांना व्हावा. महाराष्ट्राचे सागरी क्षेत्रातील स्थान महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्रालय आणि इंडियन पोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे सागरी धोरण, नवोन्मेष, शाश्वत विकास, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि समुद्री उद्योग क्षेत्रातील वाढ यावर चर्चा आणि प्रदर्शन करण्याचे हे एक व्यासपीठ ठरणार आहे. यामध्ये अनेक उपप्रकल्प, चर्चासत्र आणि थीम असतील. या कार्यक्रमास १०० पेक्षा जास्त देश, हजारो प्रतिनिधी आणि देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उद्योग सहभागी होणार असून ५०० हून अधिक प्रदर्शकांसह ७ सहयोगी देशांच्या मंत्रीस्तरीय प्रतिनिधींची उपस्थिती असेल.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech