मुंबई : गोंधळ, गदारोळ, सभात्याग, सत्ताधारी-विरोधक आमने-सामने, हाणामारी या आणि अशा विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन आज सूप वाजले. आता विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, ८ डिसेंबर रोजी नागपुरात होणार आहे, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना हिवाळी अधिवेशनाच्या तारखेबद्दलचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. तसेच राज्यपालांनी दिलेल्या संदेशानुसार पावसाळी अधिवेशन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा नार्वेकर यांनी केली.
अधिवेशनात झालेल्या कामकाजाचा आढावा सांगताना ते म्हणाले, या काळात एकूण १५ बैठका झाल्या आणि एकुण १३३ तास ४८ मिनिचे कामकाज झाले, तर ४५ मिनिटे वेळ वाया गेली. यात दिवसाचे सरासरी कामकाज ८ तास ५५ मिनिटे झाले. यामध्ये एक अभिनंदन प्रस्ताव, सात शोक प्रस्ताव, ८२७७ तारांकित प्रश्न, स्विकृत प्रश्न ५७९, उत्तरित झालेले प्रश्न ९२, प्राप्त सूचना ८, अस्विकृत सूचना ८, चर्चा ७, सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर प्राप्त सूचना १८१, मान्य सूचना ४२, त्यातील केवळ पाच विषयांवर चर्चा झाली. विधानसभेत १४ शासकीय विधेयके सादर झाली. १५ विधेयकांवर सहमती झाली, तर एक मागे घेण्यात आले. आमदारांकडून २४८१ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या, त्यातील ५११ स्विकृत सूचना करून १५२ सूचनांवर प्रत्यक्ष चर्चा झाली.