बीजिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनमधील तियानजिन शहरात आहेत आणि तेथे शांघाय सहकार्य संघटना (एससीओ ) शिखर परिषदेसाठी आले आहेत. चीनसोबतचे तणावपूर्ण संबंध पुन्हा सुधारण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी आणि चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात एकूण ५५ मिनिटे द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांमधील सुधारत्या संबंधांचा उल्लेख केला. दोघांची मागील भेट २०२४ मध्ये रशियाच्या कजान शहरात ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान झाली होती. पंतप्रधान मोदी सात वर्षांनंतर प्रथमच चीन दौऱ्यावर गेले आहेत. एससीओ शिखर परिषद ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान होत आहे.
चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, “मागील वर्षी कजानमध्ये आपली अतिशय फलदायी चर्चा झाली होती, ज्यामुळे आपले संबंध सकारात्मक दिशेने गेले. सीमारेषेवरील सैन्य माघारीनंतर, शांतता आणि स्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमा व्यवस्थापनासंदर्भात आपले विशेष प्रतिनिधी यांच्यात एक करार झाला आहे. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवा देखील पुन्हा सुरू होत आहे.” शी जिनपिंग यांनीही सांगितले की, दोन्ही देश परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी तयार आहेत.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “दोन्ही देशांचे २.८ अब्ज नागरिक आपल्या सहकार्याशी जोडले गेले आहेत. हे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी देखील उपयुक्त ठरेल. आम्ही परस्पर विश्वास, सन्मान आणि संवेदनशीलतेच्या आधारावर आपले संबंध पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहोत.” तसेच, पंतप्रधान मोदींनी शांघाय सहकार्य संघटनेच्या अध्यक्षपदाची यशस्वी जबाबदारी पार पाडल्याबद्दल शी जिनपिंग यांचे अभिनंदन केले. तसेच चीनमध्ये आमंत्रण दिल्याबद्दल आणि बैठकीसाठी त्यांनी आभारही मानले.
ही बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावले आहे. या टॅरिफ दरांमुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले गेले आहेत, त्यामुळे अशा वेळी मोदी आणि शी यांच्यात होणारी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ही बैठक एससीओ शिखर परिषदेच्या बाजूला स्वतंत्रपणे झाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, चर्चेच्या मुद्द्यांच्या महत्त्वपूर्णतेमुळे दोन्ही नेते दिवसभरात पुन्हा एकदा भेटू शकतात. दोघांची शेवटची भेट ऑक्टोबरमध्ये रशियाच्या कजान शहरात ब्रिक्स परिषदेत झाली होती. सोमवारी(दि.१ सप्टेंबर) भारत परतण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशीही भेट होण्याची शक्यता आहे.
एससीओ शिखर परिषदेची सुरुवात आज, रविवारी शी जिनपिंग यांच्या वतीने आयोजित अधिकृत स्वागत समारंभाने होणार आहे. चीनच्या आयोजनाखालील एससीओ प्लस शिखर परिषदेमध्ये २० परदेशी नेते सहभागी होत आहेत. चीन यावर्षी १० सदस्यीय गटाचे अध्यक्षस्थान भूषवत आहे, ज्यामध्ये रशिया, भारत, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, बेलारूस आणि चीन यांचा समावेश आहे.