मुंबई : देशातील अग्रगण्य वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने नुकतीच लाँच केलेल्या आपल्या नवीन मिड-साईज एसयूव्ही मारुती विक्टोरिसच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने ही दरवाढ ऑक्टोबर २०२५ पासून लागू केली असून, ती फक्त उच्च श्रेणीतील दोन टॉप वेरिएंट्सपुरती मर्यादित आहे. त्यामुळे नव्याने गाडी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना थोडा अधिक खर्च करावा लागणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ZXI+ (O) मॅन्युअल (Manual) आणि ZXI+ (O) ऑटोमॅटिक (AT) या दोन वेरिएंट्सच्या एक्स-शोरूम किमतीत प्रत्येकी १५,००० रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. अन्य कोणत्याही वेरिएंट्सच्या किंमतीत सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे विक्टोरिसची बेस एक्स-शोरूम किंमत अद्यापही रु. १०.५० लाखांपासून सुरू होते.
गेल्या महिन्यातच नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर ही कार भारतीय बाजारात सादर करण्यात आली होती आणि अवघ्या एका महिन्यातच तिच्या किमती वाढविण्यात आल्याने ग्राहकांमध्ये थोडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मारुती सुझुकीने या दरवाढीचे स्पष्ट कारण दिलेले नसले तरी, उत्पादन खर्चातील वाढ आणि उच्च दर्जाच्या फिचर्सच्या मागणीमुळे हा निर्णय घेतल्याचे उद्योग विश्लेषकांचे मत आहे. मारुती विक्टोरिस ही कंपनीच्या एसयूव्ही पोर्टफोलिओतील अत्यंत महत्त्वाची गाडी मानली जाते. मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये ती ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस, एमजी हेक्टर आणि टाटा हॅरियर सारख्या प्रस्थापित मॉडेल्सशी स्पर्धा करते. या कारमध्ये एलईडी हेडलाइट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, ३५+ कनेक्टेड फीचर्स तसेच ५-स्टार सुरक्षा रेटिंग यांसारखी आधुनिक आणि प्रीमियम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.